बॉलीवूडची ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी राखी सावंत काही ना काही कारणाने सतत चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच राखीला लॉरेन्स बिश्नोई टोळीने जीवे मारण्याची धमकी दिली होती. सलमान खान धमकी प्रकरणापासून दूर राहण्याचा इशारा राखी सावंतला देण्यात आला होता. त्यानंतर राखीने लॉरेन्स बिश्नोईला थेट आव्हान दिले होते. राखीचा हा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
काही दिवसांपूर्वी ईदच्या मुहूर्तावर राखी मीडियाशी संवाद साधताना म्हणाली, “मी ईदच्या मुहूर्तावर हे सांगू इच्छिते की माझ्या सलमान भावाला कुणीही स्पर्श करू नका. जर माझा जीव घेऊन तुमचं समाधान होणार असेल तर तुम्ही माझा जीव घ्या. एवढंच नाही तर माझ्या खुनाचा गुन्हादेखील तुमच्यावर घेऊ नका.” या वक्तव्यामुळे राखी सावंत चांगलीच चर्चेत आली होती. आता पुन्हा या प्रकरणामध्ये एक वेगळंच वक्तव्य तिने केलं आहे.
आणखी वाचा : राम चरण आणि उपासना यांना मुलगीच होणार? ‘या’ कारणांमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण
राखी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुरक्षेसाठी भेट घेणार आहे. इन्स्टंट बॉलिवूड या एंटरटेनमेंट पोर्टलशी संवाद साधताना राखी म्हणाली, “मी लवकरच मोदीजी यांची भेट घेणार आहे. खरंतर मी हे इतक्यात कोणालाच सांगणार नव्हते. मी झेड (z) सिक्युरिटीसाठी मोदीजी यांच्याकडे मागणी करणार आहे. जर ते ही सुरक्षाव्यवस्था कंगना रनौतला देऊ शकतात, तर मग मला का नाही देऊ शकत? कंगनाला तर कसलीही धमकी मिळाली नव्हती, माझ्याकडे तर धमक्यांचे मेल आहेत.”
काही दिवसांपूर्वी सलमानला धमक्या देणाऱ्या टोळीने राखीलासुद्धा मेलच्या माध्यमातून धमकी दिली होती. ज्या व्यक्तीने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती, त्याचं नाव ‘रॉकी भाई’ असं होतं. याप्रकरणी पोलिसांनी तपास केला असता, संबंधित आरोपी राजस्थानातील जोधपूर येथील रहिवाशी असल्याचं निष्पन्न झालं. “आपण गोरक्षक आहोत” असा दावा आरोपीनं केला होता.