बॉलीवूड अभिनेता जॅकी भगनानी व अभिनेत्री रकुल प्रीत सिंग २१ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकले. गोव्यात त्यांच्या शाही लग्नसोहळ्याची तयारी करण्यात आली होती. कुटुंबीय व जवळच्या मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. जॅकी व रकुलच्या लग्नाला बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.
गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू होती. अखेर गोव्यात समुद्रकिनारी दोघांनी लग्नगाठ बांधली. रकुल व जॅकीच्या लग्नाचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. जॅकीने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती, तर रकुलने बेबी पिंक रंगाचा सुंदर लेहंगा व त्यावर भरजरी दागिने घातले होते. या लूकमध्ये दोघेही खूपच सुंदर दिसत होते.
दरम्यान, लग्नानंतर पहिल्यांदाच रकुलने डीएनए वुमन अचिव्हर्स अवॉर्ड्स कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने जॅकीबाबत अनेक खुलासे केले आहेत. तसेच जॅकी आणि तिच्या वडिलांच्या पहिल्या भेटीबद्दल किस्साही तिने सांगितला. रकुलचे वडील भारतीय लष्कराचे निवृत्त अधिकारी आहेत. जॅकी व तिच्या वडिलांसोबतच्या पहिल्या भेटीबद्दल बोलताना ती म्हणाली, “माझे वडील फार कडक नाहीत, पण त्यांना शिस्त आवडते. जेव्हा जॅकी व माझे वडील पहिल्यांदा भेटणार होते, तेव्हा मलाच जास्त काळजी वाटत होती. जेव्हा ते जॅकीला भेटले तेव्हा त्यांनी थेट जॅकीचीच चौकशी सुरू केली. मात्र, जॅकी यासाठी आधीच तयार होता.”
या मुलाखतीत तिला तुला जॅकीची कोणती सवय आवडत नाही, असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देत ती म्हणाली, “जॅकी वक्तशीर नाही, तो वेळ पाळत नाही, पण मी खूप वक्तशीर आहे. मला ही सवय माझ्या वडिलांकडून लागली. सुरुवातीला जेव्हा जॅकी पाच मिनिटात येतो म्हणायचा तेव्हा तो तासभर लावायचा. मात्र, आता त्याच्यात सुधारणा झाली आहे. आता त्याचे पाच मिनिटं म्हणजे २० मिनिटं असतात.”
रकुलच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास, गेल्या वर्षी तिचा ‘छत्रीवाली’ चित्रपट प्रदर्शित झाला. तसेच काही दिवसांपूर्वी ती ‘आयलन’ या चित्रपटात झळकली होती. मात्र, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला. आता लवकरच ती ‘इंडियन २’ आणि ‘रामायण’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.