रकुल प्रीत सिंगने आपल्या करिअरची सुरुवात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून केली आणि नंतर मिस इंडिया स्पर्धेत आपलं नशीब आजमावलं. त्यानंतर रकुलने हिंदी चित्रपटसृष्टीतही आपली वेगळी ओळख निर्माण केली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रकुलने सांगितलं की, तिच्या आईनेच तिला मनोरंजन क्षेत्रात जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं होतं.
‘फिल्मफेअर’ला दिलेल्या मुलाखतीत रकुल म्हणाली, “माझ्या आईनेच मला सांगितलं की, मी एक ‘ड्रामा क्वीन’ आहे आणि मला विविध शोजमध्ये आपलं नशीब आजमावायला हवं. तिने मला मिस इंडिया स्पर्धेत सहभागी होण्याचा आणि मॉडेलिंग करण्याचा सल्ला दिला. माझे वडीलही माझ्या करिअरमध्ये नेहमीच साथ देत आले आहेत.” रकुल पुढे म्हणाली की, तिच्या पालकांनी तिला नेहमीच तिच्या इच्छांमध्ये साथ दिली आहे. ते नेहमीच खूप सपोर्टिव्ह राहिले आहेत,” असं ती म्हणाली.
हेही वाचा…“तुम्ही मला राष्ट्रीय पुरस्कार…”, वडील महेश भट्ट यांच्याकडे आलिया भट्टने केलेली ‘ही’ मागणी
रकुलने आपल्या पालकांच्या पाठिंब्याबद्दल सांगताना एक मजेदार किस्सा शेअर केला. मिस इंडिया स्पर्धेसाठी बिकिनी खरेदी करायची होती, तेव्हा तिच्या वडिलांनी तिच्याबरोबर खरेदीला यायचा आग्रह केला होता. ती म्हणाली, “माझे वडील माझ्याबरोबर बिकिनी खरेदीला यायचं म्हणत होते आणि सांगत होते की, ‘ब्राइट रंग घे.’” रकुल हसून सांगते की, तिला वडिलांचा पाठिंबा खूप आवडला, पण तिने शेवटी आईला बरोबर नेण्याचा निर्णय घेतला. ती म्हणाली, “मला माहीत आहे की, बाबा तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता, पण मी आईला घेऊन जाईन.” रकुलने सांगितलं की, तिला खूप भाग्यवान वाटतं की, तिला इतके सहकार्य करणारे पालक मिळाले आहेत.
नुकताच रकुलने अभिनेता आणि निर्माता जॅकी भगनानीबरोबर विवाह केला आहे. ती शेवटची कमल हासन अभिनित ‘इंडियन २’ चित्रपटात दिसली होती. सध्या ती ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटाच्या सिक्वलवर काम करत आहे.