बॉलीवूडमध्ये घराणेशाही म्हणजेच नेपोटिझमची खूप चर्चा होते. एखाद्या कलाकाराचा मुलगा किंवा मुलगी आपल्या पालकांच्या पावलावर पाऊल ठेवत इंडस्ट्रीत येते. त्यांच्याकडे इतर कलाकारांइतकी प्रतिभा नसली तरी ते केवळ ‘स्टार किड्स’ आहेत म्हणून त्यांना संधी मिळतात असे आरोपही केले जातात. बॉलीवूडमध्ये अनेक स्टार्सच्या मुलांनी अभिनयक्षेत्रात करिअर केलं आहे, ते यशस्वीही झाले आहेत. पण सर्वात श्रीमंत ‘स्टार किड’ बॉलीवूडमध्ये नाही, तर दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आहे. दक्षिणेतील या अभिनेत्याने श्रीमंतीच्या बाबतील सर्व बॉलीवूड ‘स्टार किड्स’ना मागे टाकलं आहे.
मेगास्टार चिरंजीवींचा मुलगा राम चरण हा भारतातील सर्वात श्रीमंत ‘स्टार किड’ आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राम चरणची एकूण संपत्ती सुमारे १३५० कोटी रुपयांची आहे. अभिनयासोबतच राम चरणची प्रॉडक्शन कंपनी आहे. त्याने अनेक व्यवसायांमध्ये गुंतवणूक केली आहे. त्याच्या वडिलांची म्हणजेच अभिनेते चिरंजीवी यांची संपत्ती जवळपास १६५० कोटी रुपये आहे. राम चरणजवळ खासगी जेट आणि परदेशातून इम्पोर्ट केलेल्या किमान अर्धा डझन आयात केलेल्या आलिशान कार आहेत.
‘डीएनए’च्या वृत्तानुसार, इतर अनेक कलाकार आहेत, ज्यांची संपत्ती रामचरण इतकी नसली तरी ते कोट्यधीश आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात बॉलीवूड कलाकार आहेत. या यादीत ७५० कोटी रुपयांच्या संपत्तीसह हृतिक रोशन दुसऱ्या क्रमांकावर आहे. आलिया भट्ट ५२० कोटींच्या संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. नंतर करीना कपूर ४८५ कोटी, ज्युनियर एनटीआर ४५०, आलियाचा पती रणबीर कपूर ३६५ कोटी यांचा नंबर लागतो. त्या पाठोपाठ अभिषेक बच्चन १७० कोटी आणि प्रभास २४० कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत.