बॉलीवूडमध्ये अनेक दिग्दर्शक आहेत; ज्यांचं नाव ऐकताच प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करतात. त्यापैकी एक म्हणजे राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma). एकेकाळी राम गोपाळ वर्मा यांनी ‘रंगीला’, ‘सत्या’, ‘कंपनी’ यांसारखे सुपरहिट चित्रपट हिंदी सिनेसृष्टीला दिले. आपल्या दमदार चित्रपटांनी चर्चेत येणारे राम गोपाल वर्मा अलीकडे एका विधानामुळे चर्चेत आले आहेत. राम गोपाल वर्मांनी पोलिसांबद्दल केलेल्या या विधनाची सध्या चर्चा सुरू आहे.
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा त्यांच्या चित्रपटांपेक्षा त्यांच्या स्पष्ट विचारांमुळे जास्त चर्चेत राहत असतात. एक्सवर (पुर्वीचे ट्विटर) ते अनेकदा अशा गोष्टी शेअर करतात. ज्यामुळे वाद निर्माण होतात आणि या वादातून त्यांच्यावर अनेक वेळा गुन्हेही दाखल झाले आहेत. अशाच एका मुलाखतीत अटक करायला आलेल्या पोलिसांनी आपल्याबरोबर मद्यपान केल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
राम गोपाल वर्मा यांनी ‘गेम चेंजर्स’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “४-५ वर्षांपूर्वी मी काही ट्विट केले होते. मी त्याबद्दल जास्त विचार केला नाही, मला जे वाटलं ते मी लिहिलं आणि पोस्ट केलं. मग काही तासांनी महेश भट्ट सरांनी मला फोन केला आणि रामू तुझ्या ट्विटवरून गोंधळ झाला आहे. पण हे समजून घे की, निंदा करणे कायद्याच्या विरोधात नाही’ असं ते म्हणाले.”
यापुढे ते म्हणाले, “खरं सांगायचे तर, ते कशाबद्दल बोलत आहेत हे तेव्हा मला कळलं नाही. कारण मी काय केलं होतं. हेच मी विसरून गेलो होतो. या प्रकरणाशी संबंधित त्यांच्याविरुद्ध ६-७ गुन्हे दाखल आहेत. आम्ही सर्व खटले एकत्रित करण्याचा प्रयत्न करत होतो.”
यापुढे राम गोपाल वर्मा म्हणाले की, “इतक्यात पोलिस माझ्या कार्यालयात पोहोचले. पोलिस कार्यालयात पोहोचेपर्यंत न्यायालयाने ज्या कायद्याअंतर्गत माझ्यावर गुन्हा दाखल केला होता तो कायदाच रद्द केला होता. त्यामुळे पोलिसांना काय करावे हेच कळत नव्हते. म्हणून ते सर्व माझ्याबरोबर बसले. त्यांनी मद्यपान केले आणि मग निघून गेले.”
राम गोपाल वर्मा यांनी एका मुलाखतीत कबूल केले होते की, ते त्यांच्या बहुतेक ट्विटकडे फारसे लक्ष देत नाहीत. याबद्दल त्यांनी म्हटलं होतं की, “मी जे काही ट्विट करतो ते बहुतेक अज्ञानामुळे केलेले असतात. पण कधीकधी मी हे एखाद्याला चिडवण्यासाठी किंवा त्रास देण्यासाठीदेखील करतो.”
दरम्यान, राम गोपाल वर्मा यांच्या आगामी कामाडदल बोलायचे झाले तर लवकरच त्यांचा सिंडिकेट नावाचा चित्रपट येणार आहे. मात्र यातील कलाकार व इतर माहिती अजून समोर आलेली नाही. त्यामुळे त्यांचे अनेक चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.