सध्या बॉलिवूडमध्ये शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम रचत आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत त्याने १२० कोटींची कमाई केली आहे. मुंबईसह ठिकठिकाणी हा चित्रपट सुपरहिट ठरताना दिसत आहे. सध्या संपूर्ण भारतात ‘पठाण’ची क्रेझ पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी एक ट्वीट केले आहे.
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा हे विविध कारणांमुळे चर्चेत असतात. ते सोशल मीडियावर सक्रीय असतात. राम गोपाल वर्मा यांना स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाते. नुकतंच राम गोपाल वर्मा यांनी ट्विटरवर एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी पठाणबद्दल त्यांचे मत व्यक्त केले आहे.
आणखी वाचा : “सकाळी कुठे होता भावा…” प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्याने सलमान खान ट्रोल
राम गोपाल वर्मा यांचे ट्वीट
“१) ओटीटीच्या काळात थिएटरचं कलेक्शन पुन्हा कधीच उत्तम होणार नाही.
२) शाहरुख हा लुप्त होत जाणारा कलाकार आहे.
३) बॉलिवूडमधील दिग्दर्शक कधीही दाक्षिणात्य सिनेसृष्टीप्रमाणे व्यावसायिक हिट चित्रपट बनवू शकत नाही.
४) KGF 2 ने प्रदर्शनाच्या दिवशी केलेल्या कलेक्शनचा रेकॉर्ड मोडण्यास अनेक वर्ष लागतील.
या आणि अशा अनेक समजुती पठाण चित्रपटाने मोडल्या आहेत”, असे ट्वीट राम गोपाल वर्मा यांनी केले आहे.
आणखी वाचा : “सकाळी कुठे होता भावा…” प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्याने सलमान खान ट्रोल
राम गोपाल वर्मा यांनी केलेल्या या ट्वीटमध्ये त्यांनी विविध चर्चांबद्दल सांगितले आहे. त्याबरोबर त्यांनी या सर्व चर्चांना पठाणने कशाप्रकारे उत्तर दिलंय हे देखील त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘पठाण’ चित्रपटातून शाहरुख खान चार वर्षांनी मुख्य भूमिकेत मोठ्या पडद्यावर परतला. पठाण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक ओपनिंग करणारा ठरला आहे. या चित्रपटाने ‘केजीएफ’ आणि ‘बाहुबली’, ‘वॉर’सारख्या चित्रपटांनाही मागे टाकलं आहे. अवघ्या दोन दिवसांत चित्रपटाने १०० कोटींचा आकडा ओलांडला आहे.