रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने दोन दिवसांतच बॉक्स ऑफिसवर २०० कोटींचा टप्पा पार केला असून प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहाकडे खेचून आणण्यात या चित्रपटाला यश मिळालं आहे. ‘अ‍ॅनिमल’ मध्ये प्रचंड रक्तपात, हिंसा आणि बोल्ड सीन्सदेखील आहेत ज्यामुळे त्यावर आणि त्याच्या दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगावर जोरदार टीका होतानाही दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फक्त प्रेक्षकच नव्हे तर चित्रपट समीक्षक तसेच चित्रपटसृष्टीतील काही कलाकारदेखील या चित्रपटावर टीका करत आहेत. एकूणच चित्रपटातील स्त्री व्यक्तिरेखेचे चित्रण, हिंसाचार, पुरुषी वर्चस्व स्त्रियांवर लादणारी वृत्ती अशा वेगवेगळ्या मुद्द्यांमुळे या चित्रपटावर टीका होत आहे. याउलट प्रसिद्ध निर्माते व दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ‘अ‍ॅनिमल’चं तोंडभरून कौतुक केलं आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘अ‍ॅनिमल’चं समीक्षणच राम गोपाल वर्मा यांनी शेअर केलं आहे.

आणखी वाचा : ‘अ‍ॅनिमल’च्या OTT रिलीजबद्दल नवी अपडेट; वाचा कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार रणबीरचा चित्रपट

आपल्या रिव्यूमध्ये ते लिहितात, “अ‍ॅनिमलची बॉक्स ऑफिसवरील कमाई, यश आणि चित्रपटाचा आशय आणि रणबीरच्या व्यक्तिरेखेवरुन प्रचंड मतभेद होणार आहेत. संदीपने ज्याप्रकारे नैतिक दांभिकतेचा मुखवटा फाडून टाकला आहे त्यामुळे हा चित्रपट एक खूप मोठा सांस्कृतिक बदल घडवून आणू शकेल असा माझा विश्वास आहे.” रणबीरच्या नग्न सीनबद्दलही राम गोपाल वर्मा यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “विजय त्याच्या कुटुंबासमोर आणि कर्मचाऱ्यांसमोर नग्न अवस्थेत फिरून त्याच्या उत्तम आरोग्याविषयी भाष्य करतो हा तर चित्रपटातील फार अलौकिक असा क्षण आहे.”

राम गोपाल वर्मा यांनी रणबीरच्या या चित्रपटातील कामाची तुलना हॉलिवूड अभिनेता लियोनार्डो डिकॅप्रिओच्या ‘वुल्फ ऑफ द वॉल स्ट्रीट’मधील भूमिकेशी केली आहे. इतकंच नव्हे तर या रिव्यूमध्ये त्यांनी संदीप रेड्डी वांगा यांचीही खूप प्रशंसा केली आहे. ते पुढे लिहितात, “संदीप तुझ्या पायाचा एक फोटो मला व्हॉट्सअपवर पाठव, मुख्यत्वे तीन कारणांसाठी मला तुझे चरणस्पर्श करायचे आहेत. १.सर्व चित्रपट निर्मात्यांनी ज्या गोष्टींवर डोळे बंद करून विश्वास ठेवला होता त्या प्रत्येक नियमाला तू पूर्णपणे झुगारून दिले आहेस. २. बॉलिवूड किंवा दक्षिणेतील कोणत्याही फिल्म प्रोडक्शनच्या ऑफिसमध्ये भविष्यात कोणत्याही प्रोजेक्टबद्दल कलात्मक निर्णय घेताना कायम तुझ्या चित्रपटाचाच पगडा असेल. ३. बड्याबड्या स्टार्सना ही अशी आव्हानात्मक भूमिका करायची इच्छा निर्माण होईल अन् नवे लेखक आणि दिग्दर्शक यांना प्रोत्साहन मिळेल.”

या रिव्यूमध्ये ‘अ‍ॅनिमल’मधील तृप्ती डीमरीला रणबीरचे बूट चाटायला सांगणाऱ्या डायलॉगवर मात्र राम गोपाल वर्मा नाराज झाले. रिव्यूच्या शेवटी ते म्हणाले, “रणबीर त्या मुलीला आपले बूट चाटायला सांगतो तो सीन मला खटकला अन् हे मी आधीही नमूद केले, परंतु अनिल कपूरचा क्लायमॅक्सचा शॉट अन् रणबीर कपूरला शक्ति कपूरच्या मंडित डोकं ठेवून रडताना पाहिलं अन् ते पाहून खरंच मला तुम्हा दोघांचे बूट चाटायचे आहेत.” तीन दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. रणबीरसह या चित्रपटात अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना, शक्ति कपूर, तृप्ती डीमरी हे कलाकार प्रमुख भूमिकांमध्ये आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ram gopal varma reviews animal says he want to lick shoes of ranbir and sandeep reddy vanga avn
Show comments