दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ९० च्या दशकात बॉलीवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यानंतर अलीकडच्या काळात त्यांनी बनवलेल्या काही चित्रपटांबद्दल एका मुलाखतीत भाष्य केलं. ज्या गोष्टी लोकांना खरोखर चांगल्या वाटतात, त्या गोष्टींसाठी लोकांना वाईट वाटण्याची अट समाजाने घालून दिली आहे, असं ते म्हणाले. “माझ्या आयुष्याच्या एका टप्प्यावर मला कळलं, जर तुम्ही तुमचे कुटुंब, देव आणि सामाजिक मान्यता या तीन गोष्टी सोडल्या तर, तुम्ही जगातील सर्वात मुक्त माणूस आहात. त्यानंतर, तुम्हाला जे करायचे आहे ते तुम्ही करू शकता,” असं ‘गॅलाटा प्लस’शी बोलताना म्हणाले.
तुम्ही तुम्हाला जे करायचंय ते शांतपणे न करता तुमच्या विचारांची जाहिरात का करता? असं विचारलं असता राम गोपाल वर्मा म्हणाले की त्यांना फक्त लोकांना चिडवायचे आणि उत्तेजित करायचे आहे. कारण त्यांना हे माहीत आहे की ते जसे मुक्तपणे जगत आहेत, तसंच सर्वांना जगायचं आहे. “जर त्यांना वाटत असेल की मी विकृत आहे, तर मी विकृत आहे, ठीक आहे. जर त्यांना वाटत असेल की मी वेडा आहे, तर मी आहे,” असं ते म्हणाले.
राम गोपाल वर्मांना त्यांच्या अलीकडील चित्रपटांबद्दल विचारण्यात आलं. मुलाखतकाराने त्यांच्या चित्रपटांचा ‘सॉफ्ट पॉर्न’ म्हणून उल्लेख केला. त्यावर वर्मा म्हणाले, “त्या विषयाला अशा प्रकारची कामुकता आवश्यक होती. याला कुणी सॉफ्ट पॉर्न म्हणत असेल तर माझी हरकत नाही. याबद्दलची माझी आवड आणि मी स्त्रियांबद्दल कसे बोलतो, जे मी नेहमीच केले आहे, अगदी कॉलेजमध्ये, मी सिनेमात येण्यापूर्वी… मी नेहमी तसाच होतो, आता मला स्वतःला व्यक्त करण्याची संधी मिळाली आहे.”
राम गोपाल वर्मांनी सांगितलं की विविध निर्बंधांमुळे ते याआधी सिनेमात स्वत:ला योग्यरित्या व्यक्त करू शकले नाही. “त्यांना वाटतं की मी आता तसाच झालो आहे आणि ते असे का विचार करू शकतात हे मला माहीत आहे. पण मी सध्या माझ्या आयुष्याचा वेळ घेत आहे,” असं ते म्हणाले. तसेच आता मी पूर्वीप्रमाणे मोठ्या स्टार्ससह मोठ्या बजेटचे चित्रपट बनवत नाही, याचा अर्थ असा नाही की मी नफा मिळवत नाही. उदाहरण म्हणून त्यांनी सांगितलं की त्यांनी करोना महामारीच्या काळात एक चित्रपट दिग्दर्शित केला ज्याची किंमत २ हजार रुपये होती, परंतु त्यातून त्यांनी ७० लाख रुपये कमावले होते.