दिग्दर्शक राम गोपाल वर्मा हे सध्या चित्रपटक्षेत्रात सक्रिय नसले तरी ते याबद्दल भूमिका मांडत असतात. मध्यंतरी ‘द केरला स्टोरी’ आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ओपनहायमर’बद्दल त्यांनी सोशल मीडियावर बरीच वक्तव्य केली होती. नुकतंच त्यांनी बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचं आणि त्याच्या यावर्षी प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ चित्रपटाचं कौतुक केलं आहे.
शाहरुखच्या ‘पठाण’ने दाक्षिणात्य चित्रपटांच्या लाटेला रोखलं असं वक्तव्य त्यांनी नुकतंच केलं आहे. बॉलिवूड हंगामाशी संवाद साधताना राम गोपाल वर्मा म्हणाले, “पठाणने एक गोष्ट चांगली केली ती म्हणजे आपल्याइथे आलेल्या दाक्षिणात्य चित्रपटांच्या लाटेला रोखलं. बॉलिवूडपेक्षा दाक्षिणात्य चित्रपटांना आपले प्रेक्षक जास्त गर्दी करत आहेत असा एक समज निर्माण झाला होता. ‘कांतारा’, ‘आरआरआर’, ‘केजीएफ चॅप्टर २’सारख्या चित्रपटांनी भारतीय बॉक्स ऑफिस दणाणून सोडलं होतं.”
पुढे ते म्हणाले, “याच दरम्यान ‘पठाण’ने हा मोठा गैरसमज मोडीत काढला आणि हिंदी सुपरस्टार, दिग्दर्शक आणि निर्माते यांनी बनवलेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बाजी मारली. अखेर चित्रपटाला यश मिळणं हे फार महत्त्वाचं असतं मग तो साऊथचा असो की बॉलिवूडचा. आपल्याला प्रत्येक गोष्टीला बिरुदं लावायची सवय झाली आहे. एस एस राजामौली हे जरी गुजरातमध्ये जन्माला आले असते तरी त्यांनी त्यांना जसा हवा आहे तसाच चित्रपट बनवला असता.”
शाहरुख खानच्या ‘पठाण’ने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. भारतात चित्रपटाने ५४३ कोटींचा व्यवसाय केला तर जगभरात या चित्रपटाने १००० कोटींचा टप्पा पार केला होता. तब्बल ४ वर्षांनी शाहरुख खानने या चित्रपटातून कमबॅक केलं होतं. आता प्रेक्षक त्याच्या आगामी ‘जवान’ या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत.