सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला. चित्रपट प्रदर्शित होताच काही लोकांनी त्यावर टीका करायला सुरुवात केली. राजकीय संघटनांकडून या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी होत होती. चित्रपटाची कथा धर्मांतर केलेल्या चार महिलांची आहे, ज्यांना दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील केले जाते.
एकीकडे काही लोक या चित्रपटाला प्रचंड विरोध करीत आहेत, तर दुसरीकडे या चित्रपटाला उत्तम प्रतिसादही मिळत आहे. एकही स्टार नसलेला हा चित्रपट २०० कोटींच्या कमाईचा टप्पा लवकरच गाठणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी ३२००० मुली या आकड्यावरून प्रचंड गहजब झाला होता. बऱ्याच लोकांनी या चित्रपटाची प्रशंसा केली, तर काही बॉलिवूड कलाकारांनी यावार भाष्य देखील केलेलं नाही.
आणखी वाचा : ‘दृश्यम’चा बनणार कोरिअन रिमेक; ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’दरम्यान झाली घोषणा
बॉलिवूडच्या एकंदरच या स्वभावावर नुकतंच दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी भाष्य केलं आहे. याबद्दल ट्वीट करताना राम गोपाल वर्मा लिहितात, “आपण एखादी खोटी गोष्ट लोकांना आणि स्वतःला सांगण्यात इतके सराईत झालेलो असतो की जेव्हा त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन कुणी आपल्याला सत्य सांगतं तेव्हा मात्र आपल्याला धक्काच बसतो. ‘द केरला स्टोरी’च्या अभूतपूर्व यशानंतर बॉलिवूडमध्ये एक भयाण शांतता पसरलेली आहे ही यावरून स्पष्ट होतं.”
राम गोपाल वर्मा हे त्यांच्या अशाच स्पष्टवक्तेपणासाठी चर्चेत असतात. ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाचे दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केले आहे. यामध्ये अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बालानी, सिद्धी इदनानी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करत असून लवकरच २०० कोटींचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे.