रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने पाच दिवसांतच बॉक्स ऑफिसवर ४०० कोटींचा टप्पा पार केला असून प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहाकडे खेचून आणण्यात या चित्रपटाला यश मिळालं आहे. ‘अॅनिमल’ मध्ये प्रचंड रक्तपात, हिंसा आणि बोल्ड सीन्सदेखील आहेत ज्यामुळे त्यावर आणि त्याच्या दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगावर जोरदार टीका होतानाही दिसत आहे.
फक्त प्रेक्षकच नव्हे तर चित्रपट समीक्षक तसेच चित्रपटसृष्टीतील काही कलाकारदेखील या चित्रपटावर टीका करत आहेत. एकूणच चित्रपटातील स्त्री व्यक्तिरेखेचे चित्रण, हिंसाचार, पुरुषी वर्चस्व स्त्रियांवर लादणारी वृत्ती अशा वेगवेगळ्या मुद्द्यांमुळे या चित्रपटावर टीका होत आहे. काही सेलिब्रिटीजनी चित्रपटावर टीका केली आहे तर काही लोकांनी चित्रपटाचं आणि रणबीर कपूरचं कौतुक केलं आहे. प्रसिद्ध निर्माते व दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ‘अॅनिमल’चं तोंडभरून कौतुक केलं आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर ‘अॅनिमल’चं समीक्षणच राम गोपाल वर्मा यांनी शेअर केलं. ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा झाली.
आणखी वाचा : रणबीरचा ‘अॅनिमल’ पाहून अर्शद वारसीने मानले नीतू आणि ऋषी कपूर यांचे आभार; म्हणाला, “हा मास्टरपीस…”
या समीक्षणात राम गोपाल वर्मा यांनी चित्रपटाच्या टीमचं खूप कौतुक केलं. आता नुकतंच त्यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर ट्वीट करत समीक्षकांवर निशाणा साधला आहे. एकूणच समीक्षकांनी ज्याप्रकारे संदीप रेड्डी वांगा यांच्या चित्रपटावर टीका केली आहे ती पाहता संदीप यांची प्रतिक्रिया नेमकी काय असेल हे त्यांनी एका व्हिडीओ क्लिपच्या माध्यमातून सांगितलं आहे. राम गोपाल वर्मा यांनी सुप्रसिद्ध चित्रपट ‘शोले’मधील एक व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे ज्यात गब्बर सिंह ठाकूरला पकडून बांधतो अन् त्यानंतर ठाकूरचा होणारा त्रागा अन् गब्बरचं ते कुत्सित हास्य. ही क्लिप शेअर करताना त्यात गब्बरच्या जागी संदीप रेड्डी वांगा यांचं नाव आहे तर ठाकूरच्या जागी समीक्षकांचं नाव आहे.
अशा रितीने हा मजेशीर व्हिडीओ शेअर करत राम गोपाल वर्मा यांनी समीक्षकांची टर उडवली आहे. नेटकऱ्यांनीही त्यावर मजेशीर प्रतिक्रिया देत तो व्हिडीओ शेअर केला आहे. आपल्या रिव्यू मध्ये राम गोपाल वर्मा म्हणाले होते, “अॅनिमलची बॉक्स ऑफिसवरील कमाई, यश आणि चित्रपटाचा आशय आणि रणबीरच्या व्यक्तिरेखेवरुन प्रचंड मतभेद होणार आहेत. संदीपने ज्याप्रकारे नैतिक दांभिकतेचा मुखवटा फाडून टाकला आहे त्यामुळे हा चित्रपट एक खूप मोठा सांस्कृतिक बदल घडवून आणू शकेल असा माझा विश्वास आहे.” राम गोपाल वर्मा यांनी रणबीरच्या या चित्रपटातील कामाची तुलना हॉलिवूड अभिनेता लियोनार्डो डिकॅप्रिओच्या ‘वुल्फ ऑफ द वॉल स्ट्रीट’मधील भूमिकेशी केली आहे. इतकंच नव्हे तर या रिव्यूमध्ये त्यांनी संदीप रेड्डी वांगा यांचीही खूप प्रशंसा केली आहे.