२६ वर्षीय श्रद्धा वालकरच्या हत्याप्रकरणाने सर्वत्र खळबळ उडाली आहे. तिचा प्रियकर, आफताब पूनावालाने तिची हत्या करुन मृतदेहाचे ३५ तुकडे केले. कोणाला संशय येऊ नये म्हणून आफताबने ते तुकडे घरातील फ्रिजमध्ये ठेवले होते. तो ठराविक दिवसांनी जंगलामध्ये तिच्या मृतदेहाचे तुकडे फेकायचा. श्रद्धाच्या मृत्यूनंतर तब्बल सहा महिन्यांनंतर हे दृष्कृत्य आता उघडकीस आले आहे. दिल्ली पोलिसांनी आफताबला अटक केली असून सध्या या प्रकरणावर तपास सुरु आहे.
वसईमध्ये राहणारी श्रद्धा एका डेटिंग साईटवर आफताब पूनावाला या तरुणाला भेटली. पुढे त्यांचं अफेअर सुरु झालं. काही महिन्यांनी श्रद्धाने तिच्या या नात्याची कल्पना घरच्यांना दिली. तिच्या आई-वडिलांनी या गोष्टीला विरोध केला. त्यांचा विरोध पत्करत श्रद्धाने आफताबसह लिव्ह इनमध्ये राहायला सुरुवात केली. काही महिन्यांनंतर ते दोघे दिल्लीला राहायला गेले. तेथे गेल्यावर श्रद्धाने लग्न करायची इच्छा त्याला सांगितली. हळूहळू लग्नावरुन त्यांच्यामध्ये वाद होऊ लागले. पुढे यावरुनच आफताबने तिचा खून केला असे म्हटले जात आहे.
सध्या देशभरात या गंभीर गुन्ह्याबद्दल चर्चा सुरु आहे. सोशल मीडियावर सामान्य नागरिकांपासून अनेक सेलिब्रिटींनी यावर भाष्य केले आहे. श्रद्धा वालकर हत्याप्रकरणावर दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ट्विटरवर काही पोस्ट शेअर केल्या आहेत. पहिल्या पोस्टमध्ये त्यांनी “मृत्यूनंतर शांतपणे विश्रांती घेण्याऐवजी तिने (श्रद्धा) आत्मा म्हणून परतावं आणि त्याच्या शरीराचे ७० तुकडे करावे” असे म्हटले आहे. काही मिनिटांनंतर केलेल्या दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी “कायद्याच्या भीतीने अशा क्रूर हत्या रोखणं शक्य नाही. अशा नराधमांना बळी पडलेल्यांचे आत्मे जर परत आले आणि त्या आत्मांनी मारेकऱ्यांना मारलं तरच अशा गोष्टी थांबवता येतील. हे सर्व व्हावं यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो”, असे लिहिले आहे.
त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावरुन लोक राम गोपाल वर्मा यांना ट्रोलदेखील करत आहेत. अशाच वादग्रस्त विधानांमुळे ते आधीही चर्चेत आले होते.