‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणून राम कपूर(Ram Kapoor)ची ओळख आहे. राम कपूर काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे. त्याने त्याचे वजन कमी करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. टीव्हीवर सर्वांत जास्त मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकी एक, अशी त्याची ओळख आहे. अभिनेत्याने काही हिंदी चित्रपटांतदेखील काम केले आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राम कपूरने त्याच्या खासगी आयुष्याविषयी वक्तव्य केले आहे. एका श्रीमंत घरात जन्मल्याने त्याला त्याचा मोठा फायदा झाला. अ‍ॅड गुरू व श्रीमंत उद्योजक दिवंगत अनिल कपूर यांचा राम कपूर मुलगा आहे. राम कपूरने जेव्हा अभिनय क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी वडील – मुलाच्या नात्यात तणाव निर्माण झाला. त्यांच्यात दुरावा आला. हा दुरावा जवळजवळ १० वर्षे होता, असे अभिनेत्याने सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वडिलांच्या श्रीमंतीचे मला जे फायदे मिळत होते, त्यापासून…

राम कपूरने नुकतीच सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने म्हटले, “एका श्रीमंत व्यक्तीचा मी एकुलता एक मुलगा होतो. जेव्हा मी मोठा होत होतो, त्यावेळी मला त्याचा खूप फायदा झाला. पण, शाळेनंतर मी त्यांना सांगितले की, मला त्यांची कंपनी पुढे चालवायची नाही. मला माझे स्वत:चे काहीतरी निर्माण करायचे आहे. त्यामुळे वडिलांच्या श्रीमंतीचे मला जे फायदे मिळत होते, त्यापासून मी दूर गेलो. कारण- मला माझा स्वत:चा मार्ग शोधायचा होता. त्यामध्ये माझी १० वर्षे गेली. त्यानंतर मी काम करण्यास सुरुवात केली.”

पुढे राम कपूरने पुढे असेही सांगितले की, त्याला शाळेत असल्यापासूनच अभिनय क्षेत्रात करिअर करायचे होते. मात्र, वडिलांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. राम कपूरने म्हटले, “जेव्हा मी १३-१४ वर्षांचा होतो, तेव्हाच मला अभिनेता व्हायचे होते, असे वडिलांना सांगितले होते. विशेषत: मी खूप लहान होतो आणि ते खूप मोठी व्यक्ती होते. त्यांची कंपनी त्यांच्यासाठी वारसा होती. त्यांच्या एकुलत्या एका मुलाने ती कंपनी पुढे चालवावी, असे त्यांना वाटत होते. त्यामुळे मी जेव्हा त्यांना सांगितले की, मला त्यांची कंपनी पुढे चालवायची नाही. त्यावेळी ते कोणत्या दु:खातून गेले असतील, याची मला जाणीव आहे. त्यानंतर मी अमेरिकेला गेलो आणि तिथे माझ्या आवडीच्या अॅक्टिंग स्कूलमध्ये दाखल झालो. मी ग्रॅज्युएट झालो आणि कामासाठी मी लोकांना भेटण्यास सुरुवात केली. मला माझ्या वडिलांनाच नाही, तर संपूर्ण कुटुंबासमोर हे सिद्ध करून दाखवायचे होते की, मी हे करत आहे. मला माहीत होते की, सर्व जण मी अपयशी होण्याची वाट बघत आहेत. कारण- त्यांना वाटत होते की, त्यानंतर मी योग्य मार्गावर येईन.”

याबद्दल अधिक बोलताना राम कपूरने म्हटले, “जेव्हा वडिलांच्या ऑफिसमधील लोक त्यांना त्यांच्या मुलाबरोबर फोटो काढण्यासाठी विचारू लागले, त्यावेळी वडिलांना मी कोणीतरी बनलो आहे, याची जाणीव झाली आणि मी त्यांची कंपनी चालवण्यासाठी परत येणार नाही, हे त्यांना समजले. या सगळ्याला १० वर्षे लागली. याकाळात आम्ही फार बोललो नाही. त्यानंतर त्यांच्या मनात माझ्याविषयी हळूहळू आदर निर्माण झाला. चार वर्षापूर्वी त्यांचे निधन झाले. त्यानंतर वडिलांच्या पार्टनरकडून, मित्रांकडून त्यांच्या मनात माझ्याविषयी खूप आदर होता, हे माहीत झाले.”

हेही वाचा: तेजश्री प्रधानची ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतून एक्झिट! आता मुक्ताच्या भूमिकेत झळकणार ‘ही’ अभिनेत्री

आणखी एक किस्सा सांगताना राम कपूरने म्हटले, “मी जेव्हा अमेरिकेला गेलो. त्यावेळी माझ्या वडिलांना वाटले की, मी काही आठवड्यांसाठी गेलो आहे. त्यांनी माझ्याशी बोलणे बंद केले. मला पैसे पाठवणेही बंद केले. अमेरिकेत मी स्वत: पैसे कमावून शिकलो आहे. जेवणाचे-भाड्याचे पैसे दिले आहेत. मी स्टारबक्स मध्ये काम केले, सेकंड हॅण्ड वाहने विकली आहेत. पण ते जर झाले नसते, तर आज मी जो कोणी आहे, तसा नसतो”, असे म्हणत राम कपूरने त्याची आठवण सांगितली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ram kapoor reveals he worked at starbucks sold second hand vehicles after his rich father stopped talking and sending money to him nsp