ग्लॅमर इंडस्ट्रीची अनेकांना क्रेझ असते. सिनेसृष्टीत काम करून स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी अनेकजण धडपडत असतात. बॉलीवूडमध्ये गॉडफादर नसेल तर काम मिळविण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो, पण सिनेइंडस्ट्रीतील कुटुंबामधील इच्छुकांसाठी काम मिळवणं सोपं असतं. कुटुंबामुळे दमदार पदार्पणाची संधी मिळते, पण आपल्या प्रतिभेच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकणं गरजेचं असतं. अनेक जण यात अपयशी होतात. असाच एक अभिनेता होता, ज्याने दोन फ्लॉप चित्रपट दिले आणि नंतर त्याने इंडस्ट्री सोडली. या अभिनेत्याचं नाव गिरीश कुमार आहे. ‘रमैया वस्तावैय्या’ हा त्याचा पदार्पणाचा चित्रपट होता.
मुख्य भूमिकेतून गिरीश कुमारने केलेलं पदार्पण
गिरीश कुमारने २०१३ मध्ये ‘रमैया वस्तावैय्या’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. यात त्याने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटात गिरीश कुमार सोबत श्रुती हासन व सोनू सूद महत्त्वाच्या भूमिकेत होते. गिरीश कुमारच्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती त्याचे वडील आणि टिप्स इंडस्ट्रीजचे मालक कुमार तौरानी यांनी केली होती. या चित्रपटातील ‘जीने लगा हूँ’ हे गाणं खूप गाजलं होतं.
पदार्पणाचा चित्रपट झाला फ्लॉप
‘रमैया वस्तावैय्या’मध्ये गिरीश कुमारच्या अभिनयाचं कौतुक झालं होतं, पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नव्हता. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ३८ कोटी रुपयांमध्ये बनलेला हा चित्रपट भारतात फक्त ३६ कोटींचा व्यवसाय करू शकला होता. त्याचबरोबर या चित्रपटाने जगभरात ५० कोटींचा व्यवसाय केला होता. सॅकनिल्कवरील माहितीनुसार, गिरीश कुमारचा ‘रमैया वस्तावैया’ हा चित्रपट फ्लॉप ठरला होता.
दुसरा चित्रपटही झाला फ्लॉप
पहिला चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर गिरीश कुमार याने २०१६ मध्ये ‘लवशुदा’ या रोमँटिक चित्रपटात काम केलं होतं, परंतु हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप झाला होता.
करिअरसाठी लपवलं लग्न
२०१६ मध्ये ‘लवशुदा’ रिलीज होण्यापूर्वी गिरीश कुमारने त्याची लहानपणीची मैत्रीण क्रसना मंगवानीशी लग्न केलं होतं, परंतु त्याने आपलं लग्न लपवण्याचा निर्णय घेतला. ‘इंडिया डॉट कॉम’च्या वृत्तानुसार, गिरीश कुमारने स्वतः याबद्दल सांगितलं होतं. लग्न झालंय असा टॅग लागल्यास त्याच्या करिअरवर परिणाम होऊ शकतो हा विचार करून त्याने लग्नाची माहिती लपवली होती. पण २०१७ मध्ये सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून त्याने लग्नाचा खुलासा केला होता.
सांभाळतोय वडिलांचा व्यवसाय
२०१८ मध्ये गिरीश कुमार एका शॉर्ट फिल्ममध्ये दिसला आणि त्यानंतर तो बॉलीवूड इंडस्ट्रीपासून पूर्णपणे दूर गेला. ‘डीएनए’च्या वृत्तानुसार आता गिरीश कुमार हा टिप्स इंडस्ट्रीजचा चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (सीओओ) आहे. तो त्याच्या वडिलांचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी काम करत आहे. या कंपनीची व्हॅल्यू ४७०० कोटी रुपये आहे. ही कंपनी चित्रपट निर्मिती, वितरण आणि इतर कामं करते.