ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ सिनेमा प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ‘रामायणा’वर आधारित असलेल्या या चित्रपटावर टीका होत आहे. चित्रपटातील संवाद, व्हीएफएक्स यामुळे वाद निर्माण झाला आहे. सर्वच स्तरातून या चित्रपटावर टीका करण्यात येत आहे. आता ‘रामायण’ मालिकेत सीता मातेचं पात्र साकारुन घराघरात पोहोचलेल्या दीपिका चिखलीया यांनी ‘आदिपुरुष’ चित्रपटाबाबत भाष्य केलं आहे.
दीपिका चिखलिया यांनी ‘पीटीआय’ला मुलाखत दिली. त्या म्हणाल्या, “हिंदू महाकाव्य ही मनोरंजनासाठी नाहीत. दिग्दर्शकांनी दर काही वर्षांनी यात बदल करताना विचार केला पाहिजे. संवाद, चित्रपटात वापरण्यात आलेली भाषा आणि त्यातील काही पात्रांच्या चुकीच्या प्रदर्शनामुळे ‘आदिपुरुषवर’ टीका होत आहे.”
हेही वाचा>> राज ठाकरेंच्या राजीनाम्याचं पत्र तुम्ही लिहिलं होतं? संजय राऊत उत्तर देत म्हणाले, “आम्ही एकमेकांकडे…”
“मालिका किंवा चित्रपटाच्या माध्यमातून दर काही वर्षांनी ‘रामायण’ पडद्यावर येईल. यातील काही गोष्टी लोकांना खटकतील. कारण आमच्यासारखी रामायणाची ही प्रतिकृती नसेल. आपण प्रत्येक दोन वर्षांनी ‘रामायण’ बनवण्याचा प्रयत्न का करत आहोत? मला सगळ्यात या गोष्टीचं वाईट वाटतं. ‘रामायण’ हे मनोरंजनासाठी नाही. ते एक पुस्तक आहे. ज्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळते. आपल्या संस्काराची मुल्ये आहेत,” असंही दीपिका पुढे म्हणाल्या.
हेही वाचा>> हनुमानानंतर ‘आदिपुरुष’चे लेखक मनोज मुंतशीर यांना आठवला महाभारतातील कर्ण, म्हणाले…
दीपिका यांनी अद्याप ‘आदिपुरुष’ चित्रपट पाहिलेला नाही. यामागचं कारणा सांगत त्या म्हणाल्या, “या चित्रपटाबाबत सगळीकडे नकारात्मक चर्चा सुरू आहे. त्यामुळे हा चित्रपट पाहण्याचा मी विचारही करत नाहीये.”
‘आदिपुरुष’ चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेता प्रभास प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत आहे. तर क्रिती सेनॉनने सीता माताची भूमिका साकारली आहे. सैफ अली खान रावण तर मराठमोळा अभिनेता देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत आहे.