बहुचर्चित‘आदिपुरुष’ चित्रपट १६ जून २०२३ रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा ओलांडला असला, तरी यामधील काही संवाद आणि दृश्यांबाबत सोशल मीडियावर अजूनही गोंधळ सुरु असून अनेक जण ‘आदिपुरुष’ चित्रपटाची तुलना रामानंद सागर यांच्या ‘रामायणा’शी करत आहेत. या चित्रपटाबाबत आता‘रामायण’ मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारणाऱ्या सुनील लहरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा : “बॉयफ्रेंडमधील कोणता गुण सर्वात जास्त आवडतो?” तमन्ना भाटियाने एका शब्दात दिले उत्तर; म्हणाली…
‘एएनआय’शी संवाद साधताना सुनील लहरी म्हणाले, “मला या चित्रपटामध्ये काहीच आवडले नाही. पार्श्वसंगीत आणि काही दृश्यांमधील सिनेमॅटोग्राफी सोडली, तर मला खरंच काहीच आवडले नाही. सुरुवातीला ‘आदिपुरुष’कडून मला असंख्य अपेक्षा होत्या परंतु, चित्रपट पाहून त्यांना नेमके काय दाखवायचेय हेच मला कळाले नाही.”
हेही वाचा : “कुंदनला रोखलंत, पण शंकरला कसं थांबवाल?” ‘रांझना’च्या सिक्वेलची घोषणा, धनुषच्या लुकने वेधलं लक्ष
सुनील लहरी पुढे म्हणाले, “चित्रपट पाहण्यापूर्वी मी ‘आदिपुरुष’बद्दल कोणत्याच प्रकारचे भाष्य केले नव्हते. परंतु आता जेव्हा मला माझी प्रतिक्रिया विचारली जाते, तेव्हा सांगायला सुद्धा लाज वाटते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. माझ्याबरोबर जेवढे प्रेक्षक हा चित्रपट पाहत होते त्यांनाही राग अनावर झाला होता. हनुमानाचे संवाद ऐकून मला एक कलाकार म्हणून नाही तर एक माणूस आणि देशाचा नागरिक म्हणून चित्रपटगृहाचा पडदा फाडून टाकावा असे वाटले.”
अभिनेते पुढे म्हणाले, “भगवान हनुमानाला आज काय वाटत असेल की हे लोक माझी भूमिका साकारणाऱ्या कलाकाराकडून असे संवाद बोलून घेत आहेत. हे संवाद लिहिण्यापूर्वी निर्मात्यांनी काहीच विचार का केला नाही? खालच्या दर्जाची भाषा कशी वापरली?” याचबरोबर सुनील लहरी यांनी चित्रपटात दाखवण्यात आलेल्या रावणावरही संताप व्यक्त करत टीका केली आहे. “चित्रपटाच्या निर्मात्यांनी मूठभर पाण्यात जीव देऊन मरावे” असे ते म्हणाले. दरम्यान, ‘आदिपुरुष’चित्रपटाने आतापर्यंत जगभरातील बॉक्स ऑफिसवर ३९५ कोटींचा गल्ला जमवला आहे.