बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. राखीने पती आदिल खानवर फसवणूक व मारहाण केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. आदिलविरोधात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली होती. याप्रकरणात राखीकडून रोज नवनवे खुलासे होत आहेत. राखीच्या प्रकरणावर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राखी प्रकरणावर वाहिद अली खान यांच्याशी रामदास आठवलेंनी बातचीत केली. याचा व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. आठवले म्हणाले, “राखी सावंत एक उत्तम अभिनेत्री आहे. संपूर्ण देशभरात ती प्रसिद्ध आहे. माझ्याशीही तिचे चांगले संबंध आहेत. आमच्या पक्षाशी ती जोडली गेली आहे. आदिल खानने राखी सावंतला फसवलं आहे. त्याच्याविरोधात राखीने तक्रार दाखल केल्यानंतर ओशिवारा पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आदिलने राखीप्रमाणेट इतर महिलांनाही फसवलं असल्याच्या तक्रारी आहेत”.
हेही वाचा>> “गर्भपातानंतर १० दिवसांतच आदिलने माझ्याबरोबर शरीरसंबंध…” राखी सावंतचा पतीबाबत धक्कादायक खुलासा
“आदिलने राखीचे पैसे, दागिने घेतले आहेत. तिच्यावर अत्याचार केला आहे. रिपब्लिकन पार्टीचा राखीला पाठिंबा आहे. आदिलला कठोर शिक्षा व्हायला हवी. राखीला न्याय मिळाला पाहिजे”, असंही पुढे ते म्हणाले. आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टीकडून राखी सावंतला न्याय मिळावा यासाठी आंदोलनही करण्यात येणार होतं. परंतु, पोलिसांची परवानगी घेतली नसल्यामुळे आंदोलन ऐनवेळी रद्द करावं लागलं असल्याचं आठवलेंनी सांगितलं आहे.
राखीने आदिलविरोधात तक्रार केल्यानंतर ७ फेब्रुवारीला त्याला ओशिवारा पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आदिलला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पुन्हा १६ फेब्रुवारीला आदिलची चार दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली होती.