रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ही बॉलीवूडची लोकप्रिय जोडी कायम चर्चेत असते. परंतु, सध्या आलिया-रणबीरपेक्षा त्यांच्या लेकीची सर्वत्र चर्चा रंगलेली असते. त्यांची लेक राहा संपूर्ण बॉलीवूडपासून ते पापाराझींपर्यंत सर्वांची लाडकी आहे.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी १४ एप्रिल २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली. यानंतर नोव्हेंबर महिन्यात अभिनेत्रीने राहाला जन्म दिला. राहाच्या जन्मानंतर आलियाने चार ते पाच महिने सिनेविश्वातून ब्रेक घेतला होता. यानंतर ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटातून आलियाने मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलं. आलिया आणि रणबीर त्यांच्या प्रत्येक मुलाखतीत राहाबद्दल भरभरून बोलत असतात. अशा या गोंडस राहाचा चेहरा २५ डिसेंबर २०२३ रोजी म्हणजेच ख्रिसमसच्या दिवशी पापाराझींसमोर उघड करण्यात आला होता. राहाचा फेस रिव्हिल होताच इंटरनेटवर सर्वत्र रणबीर-आलियाची ही चिमुकली व्हायरल झाली होती. सध्या सोशल मीडियावर राहाची सर्वाधिक क्रेझ निर्माण झाली आहे. अशातच तिच्या आणखी एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
राहा नुकतीच रणबीर कपूरबरोबर गाडीतून फेरफटका मारायला निघाली होती. वांद्रे येथील रस्त्यावर श्वानाचं पिल्लू पाहून त्यांची गाडी थांबली. रस्त्यावरच्या श्वानाला पाहताच राहाने हळूच गाडीबाहेर डोकावलं आणि ती खळखळून हसु लागली. चिमुकल्या राहाची ही कृती पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पुढे, रस्त्यावरच्या बाईने या श्वानाला राहाजवळ नेल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
राहाच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेकांनी राहा देखील तिच्या पालकांप्रमाणे प्राणीप्रेमी आहे असं कमेंट सेक्शनमध्ये म्हटलं आहे. याशिवाय काही युजर्सला राहाचा गोड अंदाज पुन्हा एकदा भावला आहे.
दरम्यान, रणबीरने अलीकडेच राहाच्या नावाचा टॅटू काढल्याचं नुकत्याच व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे. यामुळे अभिनेत्याचं आपल्या लेकीवर किती प्रेम आहे हे दिसून येतं. त्याच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर रणबीर सध्या बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. तसेच आलिया भट्टची निर्मिती असलेला ‘जिगरा’ चित्रपट येत्या सप्टेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd