बॉलीवूडच्या क्यूट कपलपैकी एक असणारे रणबीर कपूर आणि आलिया भट्ट जितके चर्चेत असतात, तितकीच त्यांची गोंडस लेकही चर्चेत असते. राहा कपूरचे नवनवीन फोटो, व्हिडीओ हे सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तिचा गोंडसपणा हा नेहमी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असतो. नुकतीच ती ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचा दिग्दर्शक आणि रणबीर कपूरचा जवळचा मित्र अयान मुखर्जीबरोबर गाडीतून फिरताना दिसली. काका अयानबरोबर गाडीतून फिरतानाचा राहा कपूरचा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. पुन्हा एकदा तिच्या गोड अंदाजाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
अयान मुखर्जी व राहा कपूरचा व्हिडीओ ‘फिल्मी ग्यान’ या एंटरटेनमेंट इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत, निळ्या रंगाच्या गाडीतून राहा काका अयान मुखर्जीबरोबर फिरताना दिसत आहे. पांढऱ्या रंगाच्या सुंदर अशा फ्रॉकमध्ये राहा पाहायला मिळत आहे. गाडीत राहा एका मोठ्या फुग्याबरोबर खेळताना दिसत असून तिच्या गोंडसपणाने एकदा नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत.
या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “गोड”, “मी आतापर्यंत पाहिलेल्या बाळांपैकी सर्वात गोंडस राहा आहे”, “राहा खरंच खूप गोड आहे”, “ही ऋषी कपूर यांच्यासारखी दिसते”, “छोटी आलिया”, अशा अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
हेही वाचा – सलील कुलकर्णींनी हॉटेल व्यवसायात ठेवलं पाऊल, आईच्या हस्ते केलं उद्घाटन, पाहा फोटो
याआधी काही महिन्यांपूर्वी अयान मुखर्जीबरोबरचा राहाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत पापाराझींची गर्दी आणि त्यात मुंबईच्या उन्हामुळे हैराण झालेल्या राहाचे काहीसे वेगळे हावभाव पाहायला मिळाले होते. तसंच अयान मुखर्जी सुद्धा वैतागून “माझ्या मागे येऊ नका” असं पापाराझींना सांगताना दिसला होता. दोघांचा हा व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.
दरम्यान, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट २०२२मध्ये लग्नबंधनात अडकले आणि त्यानंतर त्याचवर्षी ६ नोव्हेंबरला राहाचा जन्म झाला. रणबीर-आलियाने आपल्या लाडक्या लेकीचा चेहरा चाहत्यांपासून एक वर्ष लपवला होता. गेल्या वर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर दोघांनी राहाची पहिली झलक दाखवली. तेव्हापासून राहाचे गोड फोटो, व्हिडीओ सतत व्हायरल होतं असतात.