बॉलीवूडमधील काही लोकप्रिय कपलच्या यादीत येणारं अग्रगण्य नाव म्हणजे अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt). २०२२ मध्ये आलिया रणबीरबरोबर लग्नबंधनात अडकली. त्यानंतर त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात तिने राहाला जन्म दिला. २०२३ साली आलिया व रणबीर यांनी ख्रिसमसच्या निमित्ताने पहिल्यांदाच लेकीला माध्यमांसमोर आणले. रणबीर व त्याच्या लेकीचे एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे आणि हे वेळोवेळी दिसूनही आले आहे.

रणबीर व लेक राहाचे अनेक फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच आता रणबीर-आलिया त्यांच्या पहिल्या लेकीनंतर दुसऱ्या अपत्याचा विचार करत असल्याच्या चर्चा होताना दिसत आहेत. रणबीर-आलिया यांनी स्पष्टपणे याबद्दल खुलासा केला नसला तरी नुकत्याच एका मुलाखतीत रणबीरने यविषयी नकळत वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले. ‘माशेबल इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत प्रश्नांची उत्तरे देताना त्याने याबद्दलचे संकेत दिले.

या मुलाखतीत रणबीरने त्याच्याबद्दल गूगलवर सर्वाधिक सर्च केलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. त्यात एक प्रश्न असा होता, “तो लवकरच नवीन टॅटू काढणार आहे का?” त्यावर रणबीरने उत्तर दिले, “अजून तरी नाही. म्हणजे मला माहीत नाही. आशा आहे की, लवकरच. काहीतरी असेल. कदाचित माझ्या मुलांचीही नावं असतील. माहीत नाही”. रणबीरने या प्रश्नाचे उत्तर देताना ‘मुलांचा’ असा उल्लेख त्याने केल्याने तो दुसऱ्या अपत्याचा विचार करीत असल्याचे म्हटले जात आहे.

याचबरोबर आलिया भट्टने अलीकडेच जय शेट्टीच्या पॉडकास्टवर राहा हे नाव निवडण्यामागील कहाणी शेअर केली. तेव्हा अभिनेत्रीने सांगितले होते की, तिनं आधीच एका मुलाचं नाव ठरवलं आहे. याबद्दल ती म्हणाली होती, “आम्ही अशी नावं शोधत होतो की, जी मुलगा आणि मुलगी अशा दोघांसाठीही योग्य असतील. राहा हे नाव ठीक आहे; मुलगा असो वा मुलगी, हे नाव दोघांनाही चांगलं दिसेल”.

यापुढे ती म्हणाली, “राहा हे नाव सर्वांत जास्त आवडले. आम्ही मुलगा आणि मुलगी दोघांचीही नावं आधीच ठरवली होती. आम्हाला मुलांची नावं सर्वांत जास्त आवडली. आम्हाला एक नाव खूप आवडलं; पण मी ते नाव आता उघड करणार नाही”. आलियाच्या या वक्तव्यानंतर रणबीरने ‘मुलांचा’ असे म्हणत उत्तर दिले आहे. त्यामुळे हे दोघे खरंच त्यांच्या दुसऱ्या अपत्याचा विचार करीत आहेत का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

Story img Loader