‘अर्जुन रेड्डी’, ‘कबीर सिंग’सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे संदीप वांगा रेड्डी यांच्या आगामी ‘ॲनिमल’ या चित्रपटात रणबीर कपूर झळकणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. या चित्रपटाचे अधिकृत पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीखदेखील जाहीर झाली आहे. यातील रणबीरच्या जबरदस्त लूकचं चांगलंच कौतुक होत आहे. नुकतंच रणबीरने या भूमिकेबद्दल भाष्य केलं आहे.
मध्यंतरी या चित्रपटाबाबत रणबीर कपूरने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारण्यासाठी तो खूप उत्सुक आहे आणि तो योग्य संधीची वाट पाहत होता असं त्याने सांगितलं. रणबीर म्हणाला होता “ॲनिमल चित्रपटातील भूमिका पाहून लोकांना धक्का बसेल. यात अनेक ग्रे शेड्स दिसणार आहेत. मी स्वतः याची आतुरतेने वाट पाहत आहे कारण चित्रपटाची कथा माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेरची आहे. मी खूप घाबरलो आहे पण चित्रपटासाठी तेवढाच उत्सुकही आहे.”
नुकताच या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रणबीर अॅनिमलचं शूटिंग एका रुग्णालयात करताना हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये रणबीरचा वाढलेले केस आणि दाढीवाला लूक दिसत आहे शिवाय निळ्या रंगाचा रुग्णालयातील गाऊनही त्याने परिधान केला आहे. रणबीरचा हा लूक पाहून चाहत्यांनी थेट कबीर सिंगची आठवण काढली आहे. या चित्रपटाचं कबीर सिंगशी काही कनेक्शन आहे का? असं चाहत्यांनी कॉमेंट करत विचारलं आहे.
या व्हिडिओमुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. या चित्रपटात रणबीरसह अनिल कपूर, रश्मिका मंदाना, परिणीती चोप्रा, बॉबी देओल, सौरभ शूक्लासारखे कलाकार पाहायला मिळणार आहेत. एका जुन्या मुलाखतीमध्ये संदीप वांगा रेड्डी यांनी हा चित्रपट खूप हिंस्त्र असेल असा खुलासाही केला होता. ११ ऑगस्ट २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.