बॉलीवूड सुपरस्टार रणबीर कपूर सध्या ‘रामायण’ या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या कलाकारांची माहिती आतापर्यंत लपवून ठेवण्यात आली होती. परंतु, अलीकडेच या चित्रपटातील प्रभू श्रीराम आणि देवी सीता या भूमिका साकारत असलेल्या कलाकारांचा पहिला लूक समोर आला आहे.
सोशल मीडियावर ‘रामायण’ सेटवरील एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत रणबीर कपूर; तर देवी सीतेच्या भूमिकेत साउथ स्टार साई पल्लवी दिसत आहे. हे व्हायरल झालेले फोटो अधिकृतरीत्या ‘झूम टीव्ही’ला प्राप्त झाले आहेत. ‘रामायण’च्या सेटवरून हे फोटोज लीक झाले आहेत.
अयोध्येचे युवराज प्रभू श्रीराम यांच्यासारखे पारंपरिक कपडे रणबीरने परिधान केले होते. तर साईने देवी सीता यांच्यासारखी वेशभूषा केली होती. ‘झूम टीव्ही’ने शनिवारी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून हे एक्सक्ल्युझिव्ह फोटो शेअर केले. या चित्रपटाद्वारे रणबीर आणि साई पल्लवीने पहिल्यांदाच एकत्रित काम केले आहे.
भगवान रामाच्या भूमिकेसाठी रणबीर शाकाहारी आहार आणि वर्कआउट रूटीनचे पालन करीत असल्याची चर्चा सुरू होती. रणबीर आणि साई पल्लवी यांचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. काही चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया देत, चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत; तर काही नेटकऱ्यांनी साई पल्लवी आणि रणबीर यांच्या या जोडीला ट्रोलदेखील केले आहे.
हेही वाचा… “संकर्षण कऱ्हाडे भित्रा ससा होता”, अभिजीत खांडकेकरने सांगितला मित्राबद्दल ‘तो’ किस्सा, म्हणाला…
“हा चित्रपट सुपर फ्लॉप होणार आहे”, अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली. “रणबीर अजिबात प्रभू श्रीराम यांच्यासारखा दिसत नाही,” असे एक युजर म्हणाला. “हे अतिशय निराशाजनक आहे. मालिकांमध्येही यापेक्षा चांगले पोशाख असतात,” अशी कमेंट एकाने केली.
हेही वाचा… “मी गणपतीची भक्त आहे”, विद्या बालनचं वक्तव्य; म्हणाली, “मी धार्मिक कामासाठी देणगी….”
याआधी रणबीर अॅनिमल या चित्रपटात झळकला होता. या चित्रपटाने बक्कळ कमाई केली; पण हा चित्रपट वादग्रस्त ठरला. या चित्रपटात रणबीरबरोबर रश्मिका मंदाना, तृप्ती डिमरी, अनिल कपूर, बॉबी देओल हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसले होते.
दरम्यान, रामायण चित्रपटाबद्दल सांगायचे झाल्यास, नितेश तिवारी यांचा ‘रामायण’ चित्रपट ऋषी वाल्मीकी यांच्या महाकाव्यावर आधारित आहे. रणबीर प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत; तर देवी सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी दिसणार आहे. केजीएफ स्टार यश या चित्रपटात रावणाची भूमिका साकारणार असल्याचीदेखील चर्चा आहे.