अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट बॉलिवूडमधील क्यूट कपल मानले जातात. दोघांमधील क्रेमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडते. सध्या दोघेही त्यांचा आगामी चित्रपट ‘रामायण’मुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात रणबीर राम तर आलिया सीतेची भूमिका साकारणार आहे. दरम्यान रणबीर आणि आलियाचा एक जूना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत रणबीर आलियाला एका चहा विक्रेत्याची माफी मागायला लावत असल्याचे दिसून येत आहे. पण माफी मागण्याएवढं आलियाने केलं काय?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रणबीर आणि आलिया एका छोट्या चहाच्या दुकानाजवळ उभे आहेत. चहा विक्रेत्याने सायकलवर आपले दुकान थाटले आहे. दरम्यान रणबीर हातात कप घेऊन चहाचा आनंद घेताना दिसत आहे. तेवढ्यात आलिया सायकलवर एक घाणेरडा कप ठेवण्याचा प्रयत्न करते. हे बघून रणबीर तिला असे न करण्याचा सल्ला देतो. यानंतर रणबीर आलियाला चहा विक्रेत्याची माफी मागण्यासही सांगतो. आलियाही चहावाल्याची माफी मागताना दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आलिया आणि रणबीरचा हा व्हिडीओ खूप जूना आहे. त्यावेळेस हे दोघे एकमेकांच्या प्रेमात नव्हते. एका चित्रपटासाठी ते भेटले असल्याचे सांगण्यात येत आहे. आलिया आणि रणबीरच्या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही युजर्स रणबीरने ज्या पद्धतीने आलियाला समजावून सांगितले त्याबद्दल त्याचे कौतुक करत आहेत. तर काहींना आलियाबरोबर रणबीरचे वागणे फारसे आवडले नाही. रणबीरने आलियाशी या पद्धतीने बोलायला नको होते, असे मत काही नेटकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा- ‘रामायण’ मालिकेतील लक्ष्मणाचा आलियाच्या सीतेच्या भूमिकेवर आक्षेप; म्हणाले, “अभिनेत्री टॅलेंटेड पण…”
आलिया आणि रणबीरच्या वर्क्रफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, आलिया भट्ट लवकरच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात आलियाबरोबर रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचे पहिले गाणे ‘तुम क्या मिले’ नुकतेच प्रदर्शित झाले आहे. तर रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.