बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या ‘तू झुठी मैं मक्कार’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. प्रमोशन कार्यक्रमांमध्ये तो अनेक विषयांवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत असतो. रणबीरने डिसेंबर महिन्यात पाकिस्तानी कलाकारांबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्या वक्तव्यावर आता त्याने प्रतिक्रिया दिली आहे.
“मी तिसरं महायुद्ध…” पाकिस्तानमध्ये केलेल्या ‘त्या’ वक्तव्याबद्दल जावेद अख्तरांची प्रतिक्रिया
अलीकडेच रणबीर त्याच्या नवीन चित्रपट ‘तू झुठी मैं मक्कार’च्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये पोहोचला होता. यावेळी त्याने आपल्या वक्तव्यावर खुलासा केला. तो म्हणाले, “माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. मी एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि अनेक पाकिस्तानी चित्रपट निर्माते मला प्रश्न विचारत होते की ‘जर तुझ्याकडे चांगला विषय असेल तर तू चित्रपट करणार का?’ मला कोणत्याही प्रकारचं वादग्रस्त विधान करायचं नव्हतं. त्यामुळे त्यावरुन एवढा मोठा वाद झाला असं मला वाटत नाही. माझ्यासाठी चित्रपट म्हणजे चित्रपट आहे आणि कला ही कला, असं रणबीरने सांगितलं.
रणबीर पुढे म्हणाला, “‘ए दिल है मुश्किलमध्ये मी फवाद खानबरोबर काम केलं आहे. राहत फतेह अली खान आणि आतिफ अस्लम हे उत्तम गायक आहेत आणि त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत योगदान दिले आहे. त्यामुळे सिनेमा हा सिनेमा असतो. मला वाटत नाही की सिनेमा सीमा पाहतो. पण कलेचा आदर नक्कीच केला पाहिजे, कला ही आपल्या देशापेक्षा मोठी नाही. म्हणूनच ज्या देशाशी तुमचे संबंध चांगले नाहीत, त्यावेळी देशच तुमची पहिली प्राथमिकता असायला हवी.”
काय म्हणाला होता रणबीर कपूर?
“कलाकाराला कोणत्याही मर्यादा नसतात. भविष्यात मला पाकिस्तानी कलाकारांबरोबर काम करायला आवडेल,” असं रणबीर रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये बोलताना म्हणाला होता.