बॉलिवूडमधील आघाडीचे चित्रपट निर्माते व दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी नवीन चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटाचं नाव आणि स्टारकास्टही समोर आली. बॉलीवूडमध्ये सध्याच्या घडीचे लोकप्रिय तीन कलाकार या चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. भन्साळींच्या या आगामी चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल मुख्य भूमिका साकारतील. या चित्रपटाचे नाव ‘लव्ह अँड वॉर’ असे आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी ख्रिसमला म्हणजेच २०२५ मध्ये डिसेंबरच्या दरम्यान प्रदर्शित होणार आहे.
या प्रोजेक्टची घोषणा झाल्यानंतर आता रणबीर कपूरने संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटावर काम करण्यासाठी काही अटी घातल्याचंही समोर आलं आहे. सर्वांना माहीत आहे की रणबीर कपूर हा भन्साळी यांच्याकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायचा. मध्यंतरी त्याने एका मुलाखतीदरम्यान भन्साळी त्यांना कशी वागणूक द्यायचे याबद्दल खुलासा केला होता. “भन्साळी हे आम्हाला मारायचे, शिवीगाळ करायचे, पण त्याचा फायदा हा या क्षेत्रात मोठं होण्यासाठीच झाला. ती एकप्रकारची शिकवण होती.” रणबीरने केलेलं हे वक्तव्य मध्यंतरी चर्चेत आलं होतं.
आणखी वाचा : “तुला २ लाथा आणि…” मेघा घाडगेने खरमरीत पोस्ट शेअर करत पुष्कर जोगला सुनावले खडेबोल
आता रणबीरने आगामी चित्रपटासाठी काही अटी घातल्या असल्याने त्याचे हे जून वक्तव्य पुन्हा समोर आले आहे. भन्साळी यांच्या सेटवर अधिक शिस्त असावी अन् काम वेळेत पूर्ण व्हावं यासाठी रणबीरने या अटी घातल्या असल्याचं सांगितलं जात आहे. बॉलिवूड हंगामाच्या रीपोर्टनुसार, निर्मात्यांनी याचं चित्रीकरण नोव्हेंबरमध्ये सुरू करायचं ठरवलं असून जुलै २०२५ पर्यंत ते पूर्ण करायचं स्पष्ट केलं आहे. त्यानंतर रणबीरच्या इतर चित्रपटाचंही चित्रीकरण असल्याने याचं चित्रीकरण वेळेत संपवावं अशी अट रणबीरने भन्साळी यांना घातली आहे.
दुसरी अट वेळेबाबत आहे. चित्रीकरणाची निश्चित वेळ आणि नीट नियोजन असायला हवं असं रणबीरने स्पष्ट केलं आहे. ‘सावरिया’च्या वेळी वेळेचं काहीच बंधन न पाळल्याने त्रास झाल्याचं त्यानेच स्पष्ट केलं. याबरोबरच सेटवरील सगळ्या डिपार्टमेंटमध्ये एक शिस्तबद्धता असावी अशी तिसरी व शेवटची अट रणबीरने घातली आहे. ‘अॅनिमल’नंतर रणबीर लगेचच आता ‘रामायण’वर काम सुरू करणार आहे. त्यानंतर तो भन्साळी यांच्या या चित्रपटासाठी वेळ देणार आहे अन् त्यानंतर तो ‘अॅनिमल पार्क’साठी तयारी सुरू करणार असल्याचं सांगितलं जात आहे.