Ranbir Kapoor : ‘परदेस’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘मुझसे दोस्ती करोगे’, ‘देवदास’, ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री म्हणून स्मिता जयकर यांना ओळखलं जातं. ऑनस्क्रीन कधी ऐश्वर्या रायची आई, तर कधी रणबीर कपूरची आई अशा अनेक भूमिका स्मिता यांनी साकारल्या आहेत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बॉलीवूड कलाकारांचा अनुभव सांगितला आहे.
अभिनेत्री स्मिता जयकर यांनी सध्याचा सुपरस्टार रणबीर कपूरबरोबर ‘अजब प्रेम की गजब कहानी’ या सिनेमात एकत्र काम केलं होतं. हा सिनेमा २००९ मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये रणबीर आणि कतरिना कैफ प्रमुख भूमिकेत होते.
स्मिता जयकर यांनी ‘अजब प्रेम की गजब कहानी’ या सिनेमात रणबीरच्या आईची भूमिका साकारली होती. मात्र, या सिनेमाच्या शूटिंगच्या आधीच रणबीर आणि स्मिता जयकर एकमेकांना भेटले होते. याचा किस्सा अभिनेत्रीने नुकत्याच ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे.
स्मिता जयकर म्हणाल्या, “रणबीर कपूर माझ्या धाकट्या मुलाला ओळखत होता. तो अगदी साधा आहे. बॉलीवूडचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि रणबीर कपूर हे तिघं माझ्या घरी आले होते. ते लोक जेवायच्या वेळेला आले होते. संजयला तेव्हा कोलंबीचं कालवण वगैरे खूप आवडायचं. मी या तिघांना कोलंबीचं कालवण वाढलं. रणबीर एवढा साधा आहे की, तो माझ्या घरी जेवायला खाली जमिनीवर बसला होता.”
“मला संजयने सब्यसाची मुखर्जींशी ओळख करून दिली… तेव्हा रणबीर खूप लहान होता. तिघेही मस्त जेवले. खरंतर, मला तो रणबीर कपूर आहे हे नंतर समजलं. तेव्हा रणबीर संजय लीला भन्साळींना असिस्ट करत होता. हे सगळे लोक खरंच खूप साधी माणसं आहेत. आपल्याला सिनेमे पाहून किंवा ते बाहेर वावरतात तेव्हा त्यांच्याकडे पाहून कुतूहल वाटतं. कारण, कलाकारांच्या भोवती सगळ्या चाहत्यांची सतत गर्दी असते म्हणून साहजिकच त्यांना तसा अॅटिट्यूड ठेवावा लागतो. पण, प्रत्यक्षात ते फार साधे आहेत.” असं स्मिता जयकर यांनी सांगितलं.