ज्याप्रमाणे कलाकारांची चित्रपटातील भूमिका चाहत्यांसाठी उत्सुकतेचा विषय असतो, त्याप्रमाणेच या कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दलदेखील चाहत्यांना उत्सुकता असते. त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींबरोबर ते कसा वेळ घालवतात, त्यांच्या आयुष्यात काय चालले आहे, याबद्दल चाहत्यांना उत्सुकता असते. आता रणबीर कपूर( Ranbir Kapoor )ने त्याचे कुटुंबाबरोबर कसे संबंध आहेत, याबद्दल वक्तव्य केले आहे.
काय म्हणाला रणबीर कपूर?
रणबीर कपूरने नुकताच निखिल कामथच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या पॉडकास्टमध्ये त्याने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. रणबीरचा त्याच्या बहिणीबरोबर मोठा होतानाचा अनुभव कसा होता, असा प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना त्याने म्हटले, “माझी बहीण माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी आहे. माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. लहान असताना आम्ही एकाच खोलीत राहायचो. मी सातवीमध्ये होतो तोपर्यंत आम्ही एकाच खोलीत राहायचो. ती १५ वर्षांची आणि मी १३ वर्षांचा असताना ती मोठी असल्याने मला अनेकदा मारायची. पण जेव्हा मी उंचीने मोठा झालो, तेव्हा मी तिला मारायला लागलो आणि त्यानंतर ती पुढच्या शिक्षणासाठी लंडनला गेली. ती परत आली तोपर्यंत मी न्यूयॉर्कला गेलो. जेव्हा मी माझं शिक्षण संपवून परत आलो, तोपर्यंत तिचं लग्न झालं होतं. आम्ही जी काही वर्षं एकत्र घालवली आहेत, त्या दिवसांची मला आठवण येत राहते.”
रणबीरने पुढे म्हटले आहे की, रिद्धिमाचं लग्न झाल्यानंतर ती दिल्लीला गेली. तिला १३ वर्षांची मुलगी आहे. तिचा नवरा ही चांगली व्यक्ती आहे. ती चांगल्या ठिकाणी आहे. मी तिच्यासाठी आनंदी आहे. पण पूर्वी जसे आम्ही एकमेकांच्या जवळ होतो, तसे आता नाही. आता मी तिच्या फार जवळ नाही. मी फार कुणाबरोबर स्वत:ला जोडून घेऊ शकत नाही. मात्र, राहाच्या जन्मानंतर मी स्वत:ला बदलत आहे.
त्याबरोबरच रणबीरने, माझ्या बालपणावर माझ्या आई-वडिलांच्या भांडणाचा परिणाम झाल्याचे म्हटले आहे. ते सतत भांडत असायचे. माझी बहीण शिक्षणासाठी बाहेर गेल्यानं मी त्यांची भांडणं एकट्यानंच सोडवण्याचा प्रयत्न करायचो. त्यामुळे मला अधिक जबाबदार झाल्यासारखं वाटलं. अनेकदा माझी आई तिला काय वाटतं, ती काय विचार करते याबद्दल माझ्याशी बोलायची; पण माझे वडील उघडपणे भावना व्यक्त करत नसायचे. त्यामुळे मला त्यांची बाजू कधी समजली नाही. त्याबरोबरच लहानपणी वडिलांच्या डोळ्यांचा रंगही बघितला नाही. त्यांच्यासमोर कायम मान खाली घालून असायचो, असेही अभिनेत्याने म्हटले आहे.