श्रद्धा कपूर आणि रणबीर कपूरचा ‘तू झुठी मै मक्कार’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून श्रद्धा आणि रणबीर ही फ्रेश जोडी प्रथमच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. लव रंजन दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलरही प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. तरुण पिढीचे प्रेमाबद्दलचे विचार आणि प्रेमाकडे बघायचा दृष्टिकोन यावर चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे.
रोमॅंटिक कॉमेडी धाटणीच्या या चित्रपटाचं ‘तेरे प्यार में’ हे फ्रेश गाणंसुद्धा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. अरिजित सिंगच्या आवाजातील हे गाणं लोकांना चांगलंच आवडलं आहे, शिवाय यात श्रद्धा आणि रणबीरमधील केमिस्ट्रीसुद्धा प्रेक्षकांना आवडली आहे. यामधील श्रद्धाचा बोल्ड अंदाज आणि रणबीरचा डान्सही लोकांच्या पसंतीस पडला आहे. सध्या श्रद्धा आणि रणबीर या चित्रपटाचं जबरदस्त प्रमोशन करताना दिसत आहेत.
आणखी वाचा : ‘पठाण’चा रेकॉर्ड ‘भोला’ मोडणार का? बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल अजय देवगणचं मोठं वक्तव्य
इतकंच नव्हे तर या चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंगही जबरदस्त झालं असल्याचं वृत्त समोर आलं आहे. ५ मार्च या दिवशी या चित्रपटाचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालं होतं. २ दिवसांपूर्वी या चित्रपटाची तब्बल २५,९०० तिकिटे विकली गेल्याचं स्पष्ट होत आहे. ॲडव्हान्स बुकिंगमध्ये या चित्रपटाने आमिरच्या लाल सिंग चड्ढा आणि ‘विक्रम वेधा’ला मागे टाकलं असलं तरी कार्तिक आर्यनच्या ‘भूलभुलैया २’ या चित्रपटाला अजून मागे टाकलेलं नाही.
ॲडव्हान्स बुकिंगचा अंदाज पाहता हा चित्रपट पहिल्या दिवशी १२ ते १५ कोटी एवढी कमाई करेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. एवढी कमाई पहिल्या दिवशी झाली तर हा चित्रपट नक्कीच बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल असं चित्रपट तज्ञांचं म्हणणं आहे.
‘तू झुठी मै मक्कार’ हा चित्रपट ८ मार्चला प्रदर्शित होणार आहे. चाहते रणबीर आणि श्रद्धा यांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत. याबरोबरच चित्रपटात अनुभव बस्सी, बोनी कपूर, डिंपल कपाडिया,मोनिका चौधरीसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.