गेल्या काही वर्षांमध्ये बॉलीवूडमध्ये अनेक ऐतिहासिक आणि पौराणिक चित्रपट प्रदर्शित झाले. यातील काही चित्रपटांना प्रेक्षकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला तर काहींकडे पाठ फिरवली. तर आता ‘रामायण’ या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. या चित्रपटासाठी रणबीर कपूर चांगलीच मेहनत घेत आहे.
दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटामध्ये रणबीर कपूर श्रीरामांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर दक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी या चित्रपटामध्ये सीतेची भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी रणबीर कपूर प्रचंड मेहनत घेत आहे. तर या भूमिकेसाठी तयारी करताना तो त्याच्या आयुष्यातील अनेक सवयींचा त्याग करणार असल्याचं म्हटलं जात आहे.
रामायण या चित्रपटात श्रीरामांची भूमिका साकारण्यासाठी रणबीर कपूरने त्याच्या जीवनशैलीत खूप बदल करण्याचं ठरवलं आहे. ‘कोईमोई’च्या वृत्तानुसार, श्रीरामांच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी रणबीर या चित्रपटाचा शूटिंग होईपर्यंत दारू पिणं आणि मांसाहार करणं पूर्णपणे बंद करणार आहे. रणबीर कपूरला या काळात श्रीरामांसारखी शुद्ध आणि पवित्र जीवनशैली जगायची असल्यामुळे त्याने हा निर्णय घेतला आहे. याबरोबरच तो लेट नाईट पार्टीही सध्या करत नाहीये असंही म्हटलं जात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटाच्या शूटिंगला रणबीर कपूर आणि साई पल्लवी पुढच्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात सुरुवात करतील. तर या चित्रपटाच्या पहिल्या भागाचं शूटिंग ऑगस्टपर्यंत संपेल असं समोर येत आहे. तर या चित्रपटाच्या पहिल्या भागात श्रीराम आणि सीता यांच्या नात्यावर अधिक लक्ष केंद्रित केलं जाणार आहे.