बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये रणबीरचे हिंस्त्र रुप बघायला मिळाले. भरपूर ॲक्शनने भरलेल्या या टीझरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. याबरोबरच यातील गाणीही सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहेत. भारताबरोबर परदेशातही या चित्रपटाची क्रेझ बघायला मिळत आहे.
गेले बरेच दिवस रणबीरचे चाहते आणि चित्रपटप्रेमी या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. इ-टाईम्सने दिलेल्या बातमीनुसार ‘अॅनिमल’ चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगला परदेशात सुरुवात झाली आहे. यूएसएमध्ये १७२ ठिकाणी या चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. आत्तापर्यंत परदेशात या चित्रपटाच्या ११०० हून अधिक तिकिटांची विक्री झाली असून यातून या चित्रपटाने १६ लाख रुपयांचा व्यवसाय प्रदर्शनाच्या आधीच केला आहे.
आणखी वाचा : Jhimma 2 Review: जीवाभावाच्या मैत्रिणींच्या रीयूनियनची भावुक करणारी गोष्ट; वाचा कसा आहे ‘झिम्मा २’
टीझरपासूनच प्रेक्षक याच्या ट्रेलरची वाट बघत होते. मध्यंतरी हा ट्रेलर रणबीरच्या वाढदिवशी येणार अशी चर्चा होती, परंतु ते शक्य झालं नाही आणि पुढे दिवाळी असल्याने ट्रेलर प्रदर्शन लांबणीवर पडलं. आता आज २३ नोव्हेंबर रोजी ‘अॅनिमल’चा ट्रेलर प्रदर्शित होणार असल्याचं दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डी यांनी जाहीर केलं. आज दुपारी दीडच्या सुमारास हा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. इतकंच नव्हे तर याबरोबरच संदीप यांनी ‘अॅनिमल’शी निगडीत आणखी काही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.
‘एक्स’ या प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत संदीप यांनी चित्रपटाची लांबी आणि त्याला मिळालेल्या सेन्सॉर प्रमाणपत्राबद्दल भाष्य केलं आहे. ‘अॅनिमल’ला आपल्या सेन्सॉर बोर्डाने ए सर्टिफिकेट दिलं असून या चित्रपटाची लांबी ३ तास २१ मिनिटं असल्याचं संदीप रेड्डी वांगा यांनी आपल्या ट्वीटमध्ये स्पष्ट केलं आहे. चाहते रणबीरच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. या चित्रपटात रणबीरसह अनिल कपूर, बॉबी देओल व रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. १ डिसेंबरला विकी कौशलच्या ‘सॅम बहादुर’सह ‘अॅनिमल’ प्रदर्शित होणार आहे.