जसं १ डिसेंबर जवळ येत आहे तसं प्रेक्षक व सिनेप्रेमी यांची उत्सुकता आणखी वाढताना दिसत आहे. १ डिसेंबरला रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ व विकी कौशलचा ‘सॅम बहादुर’ हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. दोन्ही चित्रपटांसाठी प्रेक्षक फारच उत्सुक आहेत. नुकताच ‘अ‍ॅनिमल’चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून त्यालाही लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. दोन्ही चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले असून यात रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’ने बाजी मारल्याचं मीडिया रीपोर्टवरुन स्पष्ट होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘सॅकनिल्क’च्या ट्रॅकर रिपोर्टनुसार ‘अ‍ॅनिमल’ची भारतात आत्तापर्यंत १,११,००० तिकिटे विकली गेली आहेत. त्यापैकी हिंदी व्हर्जनमध्ये ९०,५२६ तिकिटे विकली गेली असून २०,५९१ तिकिटे तमिळ आणि तेलुगू भाषेतील व्हर्जनची विकली गेली आहेत. ॲडव्हान्स बुकिंगमध्ये ‘अ‍ॅनिमल’ने ३.४ कोटींची जबरदस्त कमाई केल्याचंही या रीपोर्टमध्ये स्पष्ट झालं आहे. इतकंच नव्हे तर रणबीरच्या करिअरमधील हा चित्रपट पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा ठरू शकतो.

आणखी वाचा : रोनित रॉयच्या ‘या’ कृतीमुळे ‘काबिल’च्या सेटवर हृतिक रोशन झालेला अस्वस्थ; अभिनेत्यानेच केला खुलासा

तर विकी कौशलच्या ‘सॅम बहादुर’ ॲडव्हान्स बुकिंगमध्ये मागे पडल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. ‘सॅम बहादुर’ची आत्तापर्यंत १२,८७६ तिकिटेच विकली गेली आहेत. हे आकडे पाहता ‘सॅम बहादुर’ने प्रदर्शनाआधी ४४.७१ लाख रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवरही रणबीरचा चित्रपटच पहिल्या दिवशी बाजी मारणार हे स्पष्ट आहे.

रणबीरचा ‘अ‍ॅनिमल’ हा फार हिंस्त्र चित्रपट असल्याचं संदीप रेड्डी वांगा यांनी स्पष्ट केलेलं. याला सेन्सॉरकडून ए सर्टिफिकेट मिळालं असून याची लांबी ३ तास २१ मिनिटे आहे. विकी कौशलचा ‘सॅम बहादुर’ पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशा यांच्यावर बेतलेला बायोपिक आहे ज्याचं दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केलं आहे. दोन्ही चित्रपटांची जबरदस्त हवा असून प्रेक्षक दोन्ही चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranbir kapoors animal earns more in advance booking than vicky kaushal sam bahadur avn