रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला बहुचर्चित व बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘अॅनिमल’ अखेर १ डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. प्रेक्षकांची तिच उत्सुकता चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या पहिल्याच दिवशी पाहायला मिळाली होती. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती. चित्रपटाच्या सुरुवातीच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. ‘सॅकनिल्क’च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, भारतात या चित्रपटाने तब्बल ६१ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी जुन्या मुलाखतीमध्ये सांगितल्याप्रमाणे हा एक फार हिंसक आणि प्रचंड अस्वस्थ करणारा चित्रपट आहे. ज्यांनी ‘अॅनिमल’ पाहिला आहे त्यांना आता उत्सुकता ‘अॅनिमल पार्क’ची आहे. चित्रपटाच्या क्लायमॅक्सनंतर येणाऱ्या पोस्ट क्रेडिट सीनमुळे यावर आणखी चर्चा होताना दिसत आहे. त्या पोस्ट क्रेडिट सीनमध्ये नेमकं काय हे तर प्रेक्षकांनी चित्रपटगृहातच अनुभवायला हवं, पण यातून पुढील भागाची हिंट संदीप रेड्डी वांगा यांनी दिली आहे.
आणखी वाचा : “मी या गोष्टींकडे…” ‘कबीर सिंह’मध्ये परवानगी न घेता किस करण्याच्या सीनबद्दल संदीप रेड्डी वांगा प्रथमच बोलले
चित्रपटाच्या शेवटच्या पोस्ट क्रेडिट सीनमध्ये रणबीर कपूरचा एक भयानक, धडकी भरवणारा अवतार पाहायला मिळत आहे. तसेच या पोस्ट क्रेडिट सीनमध्ये भयानक रक्तपातही पाहायला मिळत आहे. याच सीनमध्ये ‘अॅनिमल पार्क’ या आगामी सिक्वलचीही घोषणा संदीप यांनी केली आहे. ‘अॅनिमल’मध्येच इतका रक्तपात पाहायला मिळाला तर या ‘अॅनिमल पार्क’मध्ये नेमका आणखी कसला रक्तपात पाहायला मिळेल याची कल्पनाही करता येणार नाही.
या पोस्ट क्रेडिटनंतर ‘अॅनिमल पार्क’ची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहेत. संदीप रेड्डी वांगा हे या सिक्वलची घोषणा कधी करणार याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. ‘अॅनिमल’ हा चित्रपट पिता-पुत्राच्या नात्यावर बेतलेला असून यात रणबीर कपूरने मुलाची तर अनिल कपूर यांनी त्याच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. त्याशिवाय यात बॉबी देओल रश्मिका मंदान्ना, तृप्ती डिमरी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.