बॉलीवूडमध्ये सध्या बरेच जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचं सत्र सुरू आहे. पण, यामधील मोजक्याच चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला. ‘सनम तेरी कसम’, ‘रॉकस्टार’, ‘रहना है तेरे दिल में’ अशा काही चित्रपटांनी कोट्यवधींची कमाई केली. बॉलीवूडमध्ये सुरू असलेल्या सध्याच्या याच ट्रेंडविषयी बोलताना अभिनेता रणदीप हुड्डानं आपलं परखड मत व्यक्त केलं.
‘इंडियन एक्सप्रेस’ची सीरिज एक्स्प्रेसोच्या सहाव्या भागात अभिनेता रणदीप हुड्डा आणि चित्रपट निर्माते हंसल मेहता उपस्थित राहिले होते. यावेळी हिंदी सिनेसृष्टीतील सध्याच्या परिस्थितीबद्दल चर्चा केली. तेव्हा रणदीप व हंसल यांना विचारलं गेलं की, पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद का मिळत आहे? यावर हंसल मेहता म्हणाले, “हे सोशल मीडियाचं काम आहे. पण, एखाद्याच पुन्हा प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. याचा अर्थ असा नाही की, सगळ्याच चित्रपटांना प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय.”
पुढे रणदीप हुड्डा म्हणाला की, आता प्रत्येक जण ट्रेंडनुसार चालत आहे. मी याला ‘भेड चाल’ म्हणेल. एखादी गोष्ट चालायला लागली, तर त्याचंच अनुकरण केलं जात आहे. सगळे जण तेच करू इच्छितात. ‘स्त्री’ चित्रपटाच्या यशानंतर आता सगळ्यांना हॉरर कॉमेडी चित्रपट करायचे आहेत. एक अभिनेता म्हणून मला नाही वाटतं की, हे पॅरामीटर असलं पाहिजे. अशा प्रकारच्या बऱ्याच कारणांमुळे बॉलीवूडवर संकट घोंगावत आहे.
पुढे रणदीप हुड्डा म्हणाला, “आता चित्रपट कसा बनवला पाहिजे? हे महत्त्वाचं नसून चित्रपटाचं शिक्षण अधिक जास्त होत आहे. प्रयोग करण्यासाठी खूप कमी जागा आहेत. आता फक्त ओटीटीवर प्लॅटफॉर्मवरचं प्रयोग शक्य आहे आणि मला असं वाटतं, तेदेखील अशाच चित्रपटांच्या शोधात आहेत. कारण- त्यांना प्रेक्षक आणि सबस्क्रिप्शन पाहिजे. ही एक व्यावसायिक गोष्ट आहे.”
त्याशिवाय रणदीपने २०२४ मध्ये आलेल्या स्वतःच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटविषयी सांगितलं. तो म्हणाला, “मला स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनाचा शोध घ्यायचा होता. ज्यांना जगानं चुकीचं ठरवलं. ते सखोल विचारवंत होते, जे अनेकांना समजू शकले नाहीत. मला वाईट वाटलं होतं की, आपला संपूर्ण स्वातंत्र्यलढा दोन-तीन नावांनी आणि अहिंसेपर्यंत मर्यादित ठेवला आहे; जो खरा नाही. त्यातून भारताची अत्यंत कमकुवत प्रतिमा जगासमोर मांडली, जसे आपण नाही आहोत. त्यांना हे कळायला हवं की, जर कोणी आपल्या कानशिलात लगावली, तर त्याचं आपण तोंड फोडू शकतो.”