रणदीप हुड्डाची मुख्य भूमिका असलेल्या ‘स्वातंत्र्य वीर सावरकर’ या चित्रपटाचा टीझर रविवारी त्यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटातून रणदीप दिग्दर्शक म्हणूनही पदार्पण करत आहे. या चित्रपटाचे निर्माते आनंद पंडित यांनी शूटिंगदरम्यानचे काही खुलासे केले आहेत. त्यानुसार, विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका साकारण्यासाठी रणदीपने तब्बल २६ किलो वजन कमी केलं.
‘इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, निर्माते आनंद पंडित यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की रणदीप हुड्डाने या भूमिकेसाठी १८ नाही तर तब्बल २६ किलो वजन कमी केले. “तो या पात्रात इतका गुंतला होता की पडद्यावर सावरकरांची भूमिका साकारण्यात मी कोणतीही कसर सोडणार नाही, असं तो म्हणायचा. शूटिंग संपेपर्यंत ४ महिने तो फक्त एक खजूर आणि एक ग्लास दूध प्यायचा,” असं आनंद पंडित यांनी सांगितलं.
इतकंच नव्हे तर रणदीपने या भूमिकेसाठी टक्कलही केलं, अशी माहितीही आनंद पंडित यांनी दिली. याआधी महेश मांजरेकर चित्रपटाचे दिग्दर्शन करणार होते, पण तारखा जुळून न आल्याने त्यांनी नकार दिला, त्यानंतर रणदीप हुड्डानेच या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. दरम्यान, टीझर प्रदर्शित झाला असला तरी प्रेक्षकांना चित्रपट मोठ्या पडद्यावर कधी पाहायला मिळेल, याबाबत निर्मात्यांनी कोणताही खुलासा केलेला नाही.