रणदीप हुड्डा दिग्दर्शित वीर सावरकर हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादात अडकला आहे. या सिनेमाचा ट्रेलर मंगळवारी आला. या ट्रेलरमध्ये सुभाषचंद्र बोस आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यातला एक संवाद दाखवण्यात आला आहे. त्या संवादावरुन सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्रकुमार बोस यांनी रणदीप हुड्डाला झापलं आहे.

सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये वीर सावरकरांची स्वातंत्र्य चळवळ, अंदमानातील काळ्या पाण्याची शिक्षा, हिंदू महासभेचे कार्य या सगळ्याचा उल्लेख आहे. नेताजी सुभाषचंद्र यांच्यासह आणि महात्मा गांधींसह संवाद आहेत. पंडित नेहरु, मादाम कामा, भगतसिंग, मदनलाल धिंग्रा यांची झलक आहे. वीर सावरकर यांच्या पत्नीची भूमिका अंकिता लोखंडेने साकारली आहे. अनेकांनी चित्रपटाच्या मांडणीवर आक्षेप घेण्यास सुरुवात केली आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्रकुमार बोस यांनीही रणदीप हुड्डाला सुनावले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमातल्या कुठल्या प्रसंगावर आक्षेप?

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाच्या ट्रेलरमधील एका दृश्यात स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यातील संवाद दाखवला आहे. वीर सावरकर यांच्या भूमिकेत रणदीप हुड्डा आहे. वीर सावरकर नेताजी सुभाषचंद्र बोस यांना सांगतात, जर्मनी आणि जपानच्या आधुनिक हत्यारांसह इंग्रजांवर हल्ला करा. नेमका याच संवादावर सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्रकुमार बोस यांनी रणदीप हुड्डाला झापलं आहे. रणदीप हुड्डा वीर सावरकरांवर चित्रपट करत असेल तर चांगली गोष्ट आहे पण त्याने इतिहासाचा विपर्यास करता कामा नये. वीर सावरकर हिंदुत्ववादी होते. पण नेताजी सुभाषचंद्र बोस हे उदारमतवादी होते. त्यांचं चुकीचं चित्रण या चित्रपटांत नको. वीर सावरकर यांच्याशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा संवाद जोडताना त्यांची प्रतिमा चुकीची व्हायला नको असं चंद्रकुमार बोस यांनी म्हटलं आहे.

वीर सावरकर हा चित्रपट २२ मार्चला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुरुवातीला महेश मांजरेकर करत होते. मात्र त्यांनी हा चित्रपट सोडला. त्यानंतर रणदीप हुड्डानेच सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमाचा ट्रेलर हा अत्यंत आक्रमक आहे हे दिसतं आहे. ट्रेलरनंतर चंद्रकुमार बोस यांनी नाराजी व्यक्त करत रणदीप हुड्डाला झापलं आहे. आता याबाबर रणदीप हुड्डा काही उत्तर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Story img Loader