बॉलीवूड अभिनेता रणदीप हुडा आणि लिन लैश्राम यांनी दीड वर्षापूर्वी लग्न केलं. दोघांचंही हे आंतरजातीय लग्न होतं. रणदीप हरियाणाचा जाट असून लिन मणिपूरची आहे. या दोघांचे लग्न इंफाळमध्ये पारंपरिक मणिपुरी पद्धतीने झाले होते.
रणदीप हुड्डाने नुकताच खुलासा केला की त्याचा कधीच लग्न करण्याचा विचार नव्हता, परंतु लिनला भेटल्यानंतर मत बदललं. “मला शाळेत खूप वाईट वाटायचं. मला वाटायचं की माझ्यासारखं मी ज्या प्रकारचं शिक्षण शाळेत घेतोय, तसं शिकायला मला दुसऱ्या जीवाला या जगात आणायला आवडणार नाही (हसत). त्यामुळे माझा लग्न करण्याचा हेतू नव्हताच, पण कसे तरी आम्ही एकमेकांना भेटलो आणि आम्ही लग्न केलं, याचा मला खूप आनंद झाला. मला लग्न करायला थोडा उशीर झाला कारण मला सरकारी नोकरी नाही असा विनोद मी करत असतो,” असं रणदीप म्हणाला.
मणिपूर आपल्या देशाचाच भाग – रणदीप
शुभांकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये रणदीपने सांगितलं की त्याने लग्न ईशान्येत का केलं? “तो देखील आपल्या देशाचाच एक भाग आहे. प्रेमात पडताना जात, धर्म, देश किंवा वय याचा विचार केला जात नाही. आम्ही एकत्र आलो आणि तेच महत्त्वाचं होतं,” रणदीप म्हणाला. या लग्नातही खूप अडथळे आले, असं त्याने नमूद केलं.
जातीबाहेर लग्न करणारा कुटुंबातील मी पहिला – रणदीप
Why Randeep Hooda got married to Lin Laishram in Manipur : “बऱ्याच अडचणी आल्या. इतरांप्रमाणेच माझ्या आई-वडिलांचीही इच्छा होती की, मी जातीतच लग्न करावे. जाट जातीबाहेर लग्न करत नाही. जातीबाहेर लग्न करणारा मी माझ्या कुटुंबातील पहिला आहे. त्यामुळे सगळ्यांनाच काही ना काही अडचण होती, पण ती हळूहळू दूर होत गेली. मणिपूरमध्ये तेव्हा अशांतता होती, पण लग्न वधूच्या शहरातच झालं पाहिजे, यावर मी ठाम होतो. कारण मला माझ्या पत्नीचा आणि तिच्या कुटुंबाच्या संस्कृतीचा आदर करायचा होता,” असं रणदीप म्हणाला.
वऱ्हाडींपेक्षा सुरक्षा कर्मचारी जास्त – रणदीप
लग्न सुरळीत पार पडावं यासाठी, त्यांना पुरेसे सुरक्षा कर्मचारी असावे म्हणून रणदीपला भारतीय लष्कराची मदत घ्यावी लागली. हरियाणातून मणिपूरला लग्नासाठी गेलेले रणदीपच्या कुटुंबातील नऊ सदस्य लष्कर ब्रिगेडियरच्या घरी थांबले होते. “त्यांनी आम्हाला तिथे सुरक्षित पोहोचवलं. आमच्याकडे वरातीत वऱ्हांडीपेक्षा सुरक्षा कर्मचारी जास्त होते. माझ्या वरातीत कुटुंबातील फक्त १० जण होते, कारण आम्हाला वधूच्या कुटुंबावर जास्त भार टाकायचा नव्हता. मणिपूरमध्ये अशांतता होती, त्यामुळे मला जास्त गाजावाजा नको होता,” असंही रणदीपने नमूद केलं.

रणदीप म्हणाला की त्याचे व लिनचे लग्नाचे फोटो समोर आल्यावर लोकांनी लिन आणि मणिपुरी संस्कृतीला दिलेले प्रेम पाहून तो भारावून गेला. बॉलीवूडमध्ये असूनही अत्यंत साधेपणाने लग्न केल्याबद्दल सर्वांनी त्यांचं कौतुक केलं. रणदीप म्हणाला, “तो एक अतिशय साधा सोहळा होता, पण लोकांना तो आवडला. नंतर आम्हाला समजलं की आमचं लग्न लाइव्ह दाखवलं जातंय, ते कोणी केलं होतं ते आम्हाला माहीत नाही.”
रणदीप आणि लिन एका नाटकात काम करत असताना भेटले आणि प्रेमात पडले. करोना काळात एकत्र राहण्यापूर्वी ते एकमेकांना सतत भेटायचे. रणदीपने लिनला हरियाणातील त्याच्या मूळ गावी नेलं होतं, त्यानंतर त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू झाली. अखेर नोव्हेंबर २०२३ मध्ये या जोडप्याने पारंपरिक मणिपुरी पद्धतीने लग्न केलं.