Randeep Hooda on why he rejected Rang De Basanti:ओमप्रकाश मेहरा यांचा २००६ साली प्रदर्शित झालेला ‘रंग दे बसंती’ हा चित्रपट चांगलाच गाजला. आमिर खान, आर माधवन यांची प्रमुख भूमिका चित्रपटात पाहायला मिळाली.
अभिनेता रणदीप हुड्डालादेखील राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी या चित्रपटासाठी ऑफर दिली होती. मात्र, अभिनेत्याने राम गोपाल वर्मा यांच्या चित्रपटासाठी ही ऑफर नाकारली. आता नुकत्याच एका मुलाखतीत या चित्रपटाची भूमिका नाकारून एक मोठी संधी गमावल्याबद्दल अभिनेत्याने खेद व्यक्त केला आहे.
रणदीप हुड्डा काय म्हणाला?
शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये रणदीप हुड्डाने हजेरी लावली होती. यावेळी ‘रंग दे बसंती’ चित्रपटात काम न करण्याबाबत रणदीप हुड्डा म्हणाला, “रंग दे बसंती चित्रपटात मला भगत सिंगची भूमिका करण्यासाठी विचारले होते, पण मी नकार दिला. त्यानंतर ती भूमिका सिद्धार्थने साकारली. मी जर ‘रंग दे बसंती’मध्ये काम केले असते तर मी आता वेगळ्या प्रकारचे काम करीत असतो. मी ऑडिशन दिली होती आणि मला ते आवडले होते. राकेश ओमप्रकाश काहीवेळा माझ्याकडे येत असत. कधी कधी दारू पिऊन गाडी चालवत असत. ते मला म्हणायचे की, तू चित्रपटात काम कर.”
रणदीप हुड्डा पुढे म्हणाला, “मला रंग दे बसंती चित्रपटात काम करायचे होते, त्यावेळी इंडस्ट्रीमध्ये माझे दोनच ओळखीचे लोक होते. एक माझी गर्लफ्रेंड आणि दुसरे रणदीप हुड्डा होते. माझ्या गर्लफ्रेंडने मला सांगितले की तू कोणतीही छोटी भूमिका करू नको. त्याचदरम्यान राम गोपाल वर्मा मला म्हणाले की मी तुला डी या चित्रपटात प्रमुख कास्ट करण्याचा विचार करत आहे. पोस्टरमध्ये तू आमिर खानच्या मागे उभा राहशील असे त्यांनी मला सांगितले. जाट लोकांना जसा पटकन राग येतो, तसा मला राग आला. अहंकार बाहेर आला. मी त्यांना सांगितलं की मी आमिर खानच्या मागे उभा राहणार नाही, अशाच प्रकारे मी ‘रॉक ऑन’ हा चित्रपटसुद्धा सोडला.
करिअरला पुढे नेणाऱ्या भूमिका बाजूला सारून तू वेगळ्या भूमिका साकारण्याला प्राधान्य का दिले? यावर उत्तर देताना रणदीप हुड्डा म्हणाला, “मी कायम वेगळ्या चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांबरोबर काम केले आहे, जे इंडस्ट्रीमध्ये आधीपासूनच आहेत, त्यांच्याबरोबर मी कमी काम केले आहे. कदाचित त्यामुळे माझी प्रगतीदेखील हळूहळू होत आहे. मला आधी असे वाटायचे की, माझी कला पुरेशी आहे, पण प्रत्यक्षात असे दिसत नाही.”