भूमिका कोणतीही असो, त्या भूमिकेशी अगदी समरस होऊन काम करणाऱ्या काही मोजक्या मेहनती अभिनेत्यांच्या यादीत रणदीप हुड्डा हे नाव हमखास येतंच. आजवर रणदीपने विवध भूमिका साकारल्या आहेत. पण सध्या मात्र तो त्याच्या आगामी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच सर्वांचं लक्ष या चित्रपटाकडे लागलं आहे. सर्वप्रथम हा चित्रपट महेश मांजरेकर दिग्दर्शित करणार होते. काही कारणास्तव महेश मांजरेकर यांनी यातून काढता पाय घेतला अन् दिग्दर्शनाची धुरा रणदीपने स्वतःच्या खांद्यावर पेलली.
गेल्यावर्षी या चित्रपटाचा टीझर लोकांसमोर आला. तेव्हापासूनच या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. आता या चित्रपटाचा दमदार ट्रेलरसुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. टीझरप्रमाणेच ट्रेलरही प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणाराच आहे. ट्रेलरमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनातील मुख्य घटनांवर आणि स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या योगदानावर प्रामुख्याने प्रकाश टाकण्यात आला आहे. सोमवारी म्हणजेच काल या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. त्यावेळी याचा दिग्दर्शक व अभिनेता रणदीप हुड्डा हादेखील उपस्थित होता.
मुंबईच्या जुहू परिसरातील मल्टीप्लेक्समध्ये रणदीपच्या या आगामी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. याच ट्रेलर लॉंचदरम्यान रणदीपने पत्रकारांशी संवाद साधला अन् या चित्रपटाबद्दल भाष्य केलं, इतकंच नव्हे तर हा चित्रपट सावरकरांबद्दल पसरवलेल्या चुकीच्या गोष्टींवर अत्यंत परखडपणे भाष्य करणार असल्याचंही स्पष्ट केलं. त्यांच्याविरोधात रचलेल्या प्रोपगंडाबद्दल हा चित्रपट भाष्य करणार असल्याचंही रणदीपने सांगितलं.
रणदीप म्हणाला, “हा एक अॅंटी-प्रोपगंडा चित्रपट आहे. गेल्या अनेक दशकांत सावरकरांविरोधात जो काही अपप्रचार झाला किंवा केला गेला त्याला हा चित्रपट प्रत्युत्तर असेल. सावरकर हे ‘माफीवीर’ अजिबात नव्हते. त्यांनीच नव्हे तर त्याकाळात इतरही बऱ्याच कैद्यांनी दयेचा अर्ज केलेला होता. या चित्रपटात मी या विषयावर अत्यंत विस्तृतपणे भाष्य केलं आहे.”
पुढे रणदीप म्हणाला, “जामीन मिळवण्यासाठी याचिका किंवा दयेचा अर्ज करणं हा कोणत्याही कैद्याचा मूलभूत अधिकार आहे. सावरकरांना सेल्युलर जेलमध्ये डांबण्यात आलं होतं, त्यांना तिथून बाहेर पडून देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात, राजकारणात योगदान द्यायचे होते अन् यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले जेणेकरून आपल्या देशाची सेवा त्यांना करता येईल.” लोकांच्या मनातील हे आणि असे बरेच गैरसमज या चित्रपटाच्या माध्यमातून दूर होतील असंही रणदीपने स्पष्ट केलं.
झी स्टुडिओज, आनंद पंडित, संदीप सिंह आणि रणदीप हुड्डा यांनी मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर उत्कर्ष नैथानी व रणदीप यांनी मिळून याचे संवाद लिहिले आहेत. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट २२ मार्च रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे.