भूमिकेशी अगदी समरस होऊन काम करणाऱ्या काही मोजक्या मेहनती अभिनेत्यांच्या यादीत रणदीप हुड्डा हे नाव हमखास येतंच. आजवर रणदीपने विविध भूमिका साकारल्या आहेत. पण सध्या मात्र तो त्याच्या आगामी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच सर्वांचं लक्ष या चित्रपटाकडे लागलं आहे. सर्वप्रथम हा चित्रपट महेश मांजरेकर दिग्दर्शित करणार होते. काही कारणास्तव महेश मांजरेकर यांनी यातून काढता पाय घेतला अन् दिग्दर्शनाची धुरा रणदीपने स्वतःच्या खांद्यावर पेलली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्यावर्षी या चित्रपटाचा टीझर लोकांसमोर आला. तेव्हापासूनच या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत होते. सध्या रणदीप हुड्डा या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. वेगवेगळ्या मीडिया प्लॅटफॉर्मवर रणदीप मुलाखतीमध्ये त्याच्या या चित्रपटावर काम करण्याच्या अनुभवाबद्दल भाष्य करत आहे. मध्यंतरी एका मुलाखतीदरम्यान सावरकर माफीवीर नाहीत अन् त्यांना भारतरत्न द्यायला हवा असं वक्तव्यही रणदीपने केलं होतं. आता रणदीपने राजकारणात येण्यावरुन भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : “मी जया बच्चनपेक्षा…”, पापाराझींवर वैतागलेल्या मौसमी चॅटर्जी यांचा खोचक टोमणा

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून रोहतक हरियाणा येथून रणदीप उभा राहणार असल्याची चर्चा होत होती. त्याला अभिनेत्याने पूर्णविराम दिला आहे. पीटीआयशी संवाद साधताना अभिनेता म्हणाला, “एखादा दिग्दर्शक आणि अभिनेत्याप्रमाणेच राजकारण हे गांभीर्याने घ्यायचं करिअर आहे. मी माझ्या कलक्षेत्रात अगदी मनापासून आणि प्रामाणिकपणे १००% द्यायचा प्रयत्न करतोय. जर मी राजकारणात यायचा निर्णय घेतला तर मी सर्वस्वी राजकारणातच काम करेन. एकाच वेळी अनेक गोष्टी करणाऱ्या लोकांपैकी मी नाही. सध्या मला बरेच चित्रपट करायचे आहेत, शिवाय दिग्दर्शक म्हणून माझा एक नवा प्रवास सुरू झाला आहे.”

पुढे रणदीप म्हणाला, “सध्या माझी अभिनय कारकीर्द मध्येच थांबवून राजकारणात उडी घ्यायचा माझा विचार नाही. मी इतर बऱ्याच गोष्टींच्या माध्यमातून देशाची सेवा करू शकतो किंबहुना मी ती करतोच, पण भविष्यात नेमकं काय घडेल हे कुणीच सांगू शकणार नाही.” झी स्टुडिओज, आनंद पंडित, संदीप सिंह आणि रणदीप हुड्डा यांनी मिळून ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर उत्कर्ष नैथानी व रणदीप यांनी मिळून याचे संवाद लिहिले आहेत. हा चित्रपट २२ मार्च २०२४ रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Randeep hooda says its not right time to jump into the politics avn