भूमिका कोणतीही असो, त्या भूमिकेशी अगदी समरस होऊन काम करणाऱ्या काही मोजक्या मेहनती अभिनेत्यांच्या यादीत रणदीप हुड्डा हे नाव हमखास येतंच. आजवर रणदीपने विवध भूमिका साकारल्या आहेत. पण सध्या मात्र तो त्याच्या आगामी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच सर्वांचं लक्ष या चित्रपटाकडे लागलं आहे. सर्वप्रथम हा चित्रपट महेश मांजरेकर दिग्दर्शित करणार होते. काही कारणास्तव महेश मांजरेकर यांनी यातून काढता पाय घेतला अन् दिग्दर्शनाची धुरा रणदीपने स्वतःच्या खांद्यावर पेलली.
या चित्रपटात रणदीप हा स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका साकारणार असून याचं दिग्दर्शनही त्यानेच केलं आहे. गेल्यावर्षी या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता ज्याला उदंड प्रतिसाद मिळाला होता. अखेर यावर्षी मार्च महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशातच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त रणदीपने एक खास पोस्ट शेअर करत सावरकरांना मानवंदना दिली आहे.
आणखी वाचा : अनुप सोनीने ‘क्राईम पेट्रोल’ का सोडलं? अभिनेता स्पष्टच बोलला; म्हणाला, “मी फार अस्वस्थ…”
चित्रपटाच्या रेकीदरम्यान रणदीपने अंदमानच्या सेल्युलर जेलला भेट दिली होती. तेव्हाचे फोटोज रणदीपने शेअर केले आहेत. सावरकर यांना ज्या कोठडीत ठेवलं होतं त्या सेलमध्ये जाऊन रणदीप सावरकरांच्या प्रतिमेपुढे नतमस्तक झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. हे फोटोज रणदीपने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
आपल्या या पोस्टमध्ये रणदीप लिहितो, “भारतमातेचा सर्वात महान पुत्र, नेता, स्वातंत्र्यसैनिक, लेखक, कवि, तत्वज्ञ अशा स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी. त्यांच्या बुद्धीचं प्रखर तेज व साहसाला घाबरून ब्रिटिशांनी त्यांना ७ बाय ११ च्या छोट्याश्या जेलमध्ये दोन काळ्यापाण्याच्या शिक्षेसाठी डांबलं. त्यांच्यावरील बायपीक करताना रेकीदरम्यान मी स्वतःला अंदमानच्या या कोठडीत बंद करून घेऊन बघितलं. जिथे सावरकरांनी ११ वर्षे शिक्षा भोगली त्या जेलमध्ये मी २० मिनिटंदेखील राहू शकलो नाही. त्यांची जिद्द, चिकाटी आणि स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचं योगदान हे अतुलनीय आहे, म्हणूनच आज कित्येक भारत विरोधी मंडळी त्यांची बदनामी करू पहात आहेत. त्याना शतशः नमन!”
२२ मार्च २०२४ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा चित्रपट प्रामुख्याने हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटात रणदीप हुड्डासह अंकिता लोखंडे व अमित सियाल हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटासाठी रणदीप हुड्डानेही प्रचंड मेहनत घेतलेली आहे. प्रेक्षक त्याला या भूमिकेत पाहण्यासाठी फारच उत्सुक आहेत.