विनायक दामोदर सावरकर अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित ‘वीर सावरकर : सिक्रेट फाइल्स’ या हिंदी वेब सीरिजची घोषणा करण्यात आली. मराठमोळा अभिनेता सौरभ गोखले यात मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचं स्पष्ट झालं. याच दिवसाचं औचित्य साधून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर बनत असलेल्या आणखी एका चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला.
या चित्रपटाच्या अपडेटबाबत बरेच प्रेक्षक फार आतुरतेने वाट बघत होते. अखेर अभिनेता रणदीप हुड्डा याच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये सावरकर यांचे विचार आणि देशासाठी त्यांनी केलेला त्याग याचं चित्रण पाहायला मिळत आहे. “गांधीजी वाईट नव्हते, पण जर ते त्यांच्या अहिंसेच्या तत्वावर अडून राहिले नसते तर भारताला ३३ वर्षांपूर्वीच स्वातंत्र्य मिळालं असतं.” असा संवाद टीझरमध्ये आपल्याला ऐकायला मिळतो.
आणखी वाचा : “हा इस्लाम नाही…” ‘द केरला स्टोरी’फेम अभिनेत्री योगिता बिहानीचं मोठं वक्तव्य
रणदीप हुड्डा या चित्रपटात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्या लूकची चर्चा प्रचंड झाली होती, पण आता या टीझरमधील झलक पाहून प्रेक्षक आणखी उत्सुक झाले आहेत. शिवाय या चित्रपटातील संवादही उत्तम असणार याची झलक या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे.
सर्वप्रथम हा चित्रपट महेश मांजरेकर दिग्दर्शित करणार होते. नंतर काही कारणास्तव त्यांनी या प्रोजेक्टमधून काढता पाय घेतला आणि मग दिग्दर्शनाची धुरा रणदीपने स्वतःच्या खांद्यावर घ्यायचं ठरवलं. या भूमिकेसाठी स्वतःच्या शरीरासाठी रणदीपने जी मेहनत घेतली आहे ती या टीझरमध्ये दिसत आहे. #WhoKilledHisStory हे हॅशटॅग वापरत हा टीझर रणदीपने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.
चित्रपटात आणखी कोणते कलाकार दिसणार आहे याबद्दल अजून माहिती मिळालेली नाही, शिवाय प्रदर्शनाच्या तारखेबद्दलही खुलासा करण्यात आलेला नाही. या वर्षी म्हणजेच २०२३ साली हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.