राजकुमार संतोषी यांनी २०१६ मध्ये रणदीप हुड्डाला मुख्य भूमिकेत घेत हवालदार ईशर सिंग यांच्या मुख्य भूमिकेत ‘बॅटल ऑफ सारागढी’ची घोषणा केली होती. हीच भूमिका अक्षय कुमारने त्याच्या २०१८ मध्ये आलेल्या ‘केसरी’ या चित्रपटात साकारली होती. अक्षयने २०१८ मध्ये या चित्रपटाची घोषणा केली आणि त्याच वर्षी तो प्रदर्शित झाला. त्यामुळे रणदीपचे तीन वर्षांचे प्रयत्न आणि मेहनत व्यर्थ गेली. ज्यामुळे तो नैराश्यात गेला होता. त्याने एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला आहे.
एका मुलाखतीत रणदीपने सांगितलं की राजकुमार संतोषी यांचा ‘बॅटल ऑफ सारागढी’ चित्रपट प्रदर्शित न झाल्यामुळे त्याला धक्का बसला. कोणीतरी आपली मोठी फसवणूक केली असं त्याला वाटत होतं. मी तीन वर्षे ईशर सिंगच्या भूमिकेत जगलो होतो, यासाठी मी केस आणि दाढी वाढवली होती, त्या भूमिकेसाठी मी अनेक चित्रपट नाकारले होते, असंही त्याने सांगितलं. अक्षयने नंतर घोषणा करून तो चित्रपट प्रदर्शित केला, परिणामी रणदीपचा चित्रपट प्रदर्शित होऊ लागला नाही. त्या भूमिकेसाठी त्याने तीन वर्षे घेतलेली मेहनत वाया गेली आणि तो नैराश्यात गेला.
रणदीप ‘मॅशेबल इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, “आयुष्यात अनेक प्रसंग आले जेव्हा मला वाटलं की आता अंधाराशिवाय काहीही नाही. मी डिप्रेशनच्या एका मोठ्या टप्प्यातून गेलो. मी सारगढीसाठी एक्स्ट्रक्शन सोडण्याचा विचार केला आणि सारागढ़ीसाठी तीन वर्षे दिली, त्या काळात मी अनेक चित्रपट सोडले. पण चित्रपट अचानक बंद झाल्याने माझ्यावर त्याचा परिणाम झाला. माझे पालक मला एकटं सोडायचे नाही. कोणीतरी माझी दाढी कापेल या भीतीने मी माझी खोली आतून बंद करून ठेवायचो. पण नंतर मी ठरवलं की मी माझ्यासोबत असं पुन्हा कधीही होऊ देणार नाही,” असं त्याने सांगितलं.
दरम्यान, आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या रणदीपला एका चित्रपटासाठी तब्बल तीन वर्षे वाया घालवायला लागली. अनेक चित्रपट हातातून गेले आणि तो नैराश्यात गेला. यातून सावरायला त्याला वेळ लागला. सध्या तो ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटावर काम करत आहे. या चित्रपटात तो वीर सावरकांची भूमिका साकारणार आहे. तसेच दिग्दर्शनही तोच करत आहे.