बॉलीवूडमध्ये कपूर घराण्याचे एक वेगळे स्थान आहे. राज कपूर(Raj Kappor) यांच्यापासून रणबीर कपूरपर्यंत सर्वांनीच त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. ऋषी कपूर, रणधीर कपूर(Randhir Kapoor) यांनीही त्यांचे बॉलीवूडमध्ये वेगळे स्थान निर्माण केले होते. अनेकदा या कलाकारांच्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक आयुष्याबद्दल किस्से सांगितले जातात. काही वेळा कलाकारांच्या जवळच्या व्यक्ती तर काही वेळा हे कलाकार स्वत:देखील अनेकदा काही खुलासे करताना दिसतात. आता रणधीर कपूर यांनी एका कार्यक्रमात वडील राज कपूर यांचा त्यांच्या आयुष्यावर किती प्रभाव होता, तसेच चित्रपटसृष्टीतील त्यांचे सुरुवातीचे दिवस कसे होते, यावर वक्तव्य केले आहे.
राज कपूर यांनी…
द कपिल शर्मा शोमध्ये रणधीर कपूर यांनी काही दिवसांपूर्वी हजेरी लावली होती. यावेळी रणधीर कपूर यांनी खुलासा केला की, राज कपूर यांनी त्यांना दिग्दर्शक म्हणून काम करण्यास नकार दिला. राज कपूर यांनी रणधीर कपूर यांना लेख टंडन यांच्याकडे सहाय्यक म्हणून पाठवले. त्यांचे म्हणणे असे होते की, मालकाचा मुलगा स्वत:च्याच कंपनीत काम करू शकत नाही. राज कपूर यांना वाटायचे की रणधीर कपूर यांनी बसने प्रवास केला पाहिजे, कारण त्यांना जगण्यातला संघर्ष समजला पाहिजे.
पुढे एक किस्सा सांगत रणधीर कपूर म्हणाले, “मी बसने, ट्रेनने प्रवास केला आहे. सुट्ट्यांच्या दिवशी मी माझ्या वडिलांची कार चालवत असे. त्यानंतर मी अभिनेता झालो. अभिनेता झाल्यानंतर मी एक लहान गाडी चालवत असे. एक दिवस एक भिकारी माझ्याजवळ आला आणि त्याने माझ्या कारची खिल्ली उडवली. तो मला म्हणाला की चित्रपटात तू मोठ-मोठ्या गाड्या चालवतोस, मात्र प्रत्यक्षात तू अशा गाड्या चालवतोस. त्यानंतर मी थेट घरी गेलो आणि माझी पत्नी बबीताला विचारले की, तुझ्याजवळ तुझे साठलेले किती पैसे आहेत? मी काही निर्मात्यांकडून आगाऊ पैसे घेतले आणि मी माझ्यासाठी एक नवीन गाडी खरेदी केली.”
नवीन कार पाहिल्यानंतर वडिलांची म्हणजेच राज कपूर यांची काय प्रतिक्रिया होती. यावर बोलताना अभिनेते म्हणाले, “मी माझी नवीन गाडी माझ्या वडिलांना दाखविली, त्यांनी माझे अभिनंदन केले आणि ते खूप आनंदी असल्याचे सांगितले. त्यानंतर मी त्यांना सुचवले की तुम्हीसुद्धा नवीन गाडी घेतली पाहिजे. राज कपूर यांच्या स्टेटसला शोभणारी गाडी तुम्ही घेतली पाहिजे. यावर ते म्हणाले की मी जरी बसने प्रवास केला तरी लोक म्हणतील, राज कपूर बसने प्रवास करीत आहेत, त्यामुळे गाडीची गरज तुला वाटते, जेणेकरून लोक गाडी आणि तुला असे दोघांना पाहू शकतील.”
दरम्यान, रणधीर कपूर यांनी बबीता यांच्याशी १९७१ ला लग्न केले. त्यांना करिश्मा आणि करिना कपूर या दोन मुली आहेत. दोघीही बॉलीवूडमधील मोठ्या अभिनेत्री आहेत.