अभिनेत्री राणी मुखर्जीचा आज ४५ वा वाढदिवस आहे. आपल्या करिअरमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपट देणारी राणी चित्रपटांसोबतच खासगी आयुष्याचीमुळेही चर्चेत राहिली. एकेकाळी राणी मुखर्जी आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या अफेअरची जोरदार चर्चा झाली होती. पण काही काळानंतर त्यांचं ब्रेकअप झालं आणि या दोघांमधील संबंध एवढे बिघडले की बच्चन कुटुंबीयांनी राणीला अभिषेक- ऐश्वर्याच्या लग्नाचं निमंत्रणही दिलं नव्हतं.
अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांचा साखरपुडा मोडल्यानंतर अभिषेक आणि राणी यांच्यातील जवळीक हळूहळू वाढू लागली. राणीचं अभिषेकवर खूप प्रेम होतं असंही म्हटलं जातं. राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन यांनी एकमेकांसोबत ‘बंटी और बबली’, ‘युवा’, ‘कभी अलविदा ना कहना’ सारख्या धमाकेदार चित्रपटांमध्ये काम केलं होतं. या चित्रपटांदरम्यान या दोघांमधील जवळीक वाढली. एवढंच नाही तर दोघांचेही कुटुंबीय एकमेकांना भेटल्याचीही चर्चा होती. बऱ्याच पार्टी आणि कार्यक्रमात अभिषेक आणि राणी एकत्र दिसायचे. जया बच्चन स्वतः बंगाली असल्यानं त्यांची सून देखील बंगाली असावी असं त्यांना वाटायचं आणि त्यामुळे त्यांना राणी मुखर्जी देखील आवडली होती. अभिषेकसाठी राणी मुखर्जीला जया बच्चन यांचा होकार होता. पण नंतर जया बच्चन यांनीच राणी आणि अभिषेक यांच्यातलं नातं संपवलं असं म्हटलं जातं.
काही रिपोर्ट्सनुसार राणी मुखर्जीवर जया बच्चन नाराज होत्या. याचं कारण म्हणजे त्यावेळी संजय लीला भन्साळी यांचा हिट चित्रपट ‘ब्लॅक’मध्ये राणी मुखर्जी आणि अमिताभ बच्चन यांनी एकत्र काम केलं होतं. या चित्रपटात राणी आणि अमिताभ यांचा एक किसिंग सीन होता. ज्यावर जया बच्चन यांनी आक्षेप घेतला होता. आपल्या होणाऱ्या सूनेनं अशाप्रकारचा सीन सासऱ्याबरोबर करणं जया यांना मान्य नव्हतं. मात्र राणीनं या सीनला होकार दिला होता. याच कारणाने राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन यांचं ब्रेकअप झालं, असं म्हटलं जातं.
राणीशी ब्रेकअपनंतर अभिषेकने ऐश्वर्या रायशी लग्न केलं. तर, राणीनेही यशराज फिल्म्सचा मालक आदित्य चोप्राशी २०१४मध्ये लग्न केलं. ऐश्वर्या-अभिषेकला आराध्या नावाची मुलगी आहे, तर आदित्य-राणीला आदिरा नावाची मुलगी आहे.