शत्रुघ्न सिन्हा(Shatrughan Sinha) व संजय खान(Sanjay Khan) हे ७०-८० च्या दशकात बॉलीवूडमधील मोठे कलाकार होते. अभिनयासाठीच नाही, तर ते त्यांच्या अटींवर जगण्यासाठी आणि मोठ्या पार्ट्या देण्यासाठीदेखील ओळखले जात. अशाच एका पार्टीत दोघांमध्ये भांडण झाले आणि ते भांडण इतके वाढले की, शत्रुघ्न सिन्हा व त्यांच्या मित्रांनी संजय खन्ना यांच्या घराबाहेर गोळीबार केला होता. आता दिग्गज अभिनेते रणजीत यांनी त्यावेळी नेमके काय झाले होते, याबद्दल एका मुलाखतीत खुलासा केला आहे.
शत्रुघ्न सिन्हाने संजय खानच्या गालावर…
रणजीत यांनी नुकतीच विकी लालवाणीच्या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी शत्रुघ्न सिन्हा व संजय खान यांच्यातील भांडणाविषयी सांगितले. ते त्या पार्टीला उपस्थित नव्हते. मात्र, तिथे उपस्थित असणाऱ्या एका मित्राने त्यांना झालेल्या घटनेबद्दल सांगितले. अभिनेते रणजीत म्हणाले, “माझ्या मित्राने मला सांगितले की, शत्रुघ्न सिन्हाने संजय खानच्या गालावर चिमटा काढला. पण, संजय खानला ते आवडले नाही आणि त्याने शत्रुघ्न सिन्हाच्या कानाखाली मारली. त्यामुळे त्यांच्यात भांडणाला सुरुवात झाली. रीना रॉय त्यावेळी शत्रुघ्न सिन्हाबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. तीसुद्धा त्या पार्टीत हजर होती. तिला खूप राग आला. संजयने तिच्याशीदेखील भांडण केले. त्यामुळे वाद अजून वाढला. त्यानंतर संजय त्यांना म्हणाला की, तुम्हाला हे सगळं करायचं असेल, तर तुम्ही इथून बाहेर जा. तुम्ही अशी दुसऱ्याची पार्टी खराब करू शकत नाही. त्यानंतर ते सगळे तिथून निघाले आणि माझ्या घरी आले.
“मी त्यावेळी माझ्या गर्लफ्रेंडबरोबर होतो. त्यांनी माझ्या गर्लफ्रेंडला पाहावे, भेटावे, असे मला वाटत नव्हते. त्यामुळे स्वत:ला स्वत:च्याच घरात कोंडून घेतले. अचानक मला गोळीबाराचा आवाज ऐकू आला. त्यांनी हवेत गोळीबार केला होता. त्यानंतर ते संजय खानच्या घराकडे गेले आणि तिथेही गोळीबार केला. मी शत्रुघ्न सिन्हा व त्याचे मित्र जाण्याची वाट पाहत होतो; जेणेकरून मला तिला घरी सोडता येईल.
शत्रुघ्न सिन्हा व त्याचे मित्र गेल्यानंतर लगेचच मी माझ्या गर्लफ्रेंडला तिच्या घरी सोडून आलो. मी माझ्या घरी परत आलो, तर तिथे मला संजय खान बसलेला दिसला. त्याला तिथे पाहिल्यानंतर मी विचारले की, तू इथे काय करत आहेस? त्यानंतर त्याने मला संपूर्ण घटना सांगितली. त्याला खूप राग आला होता. तो मला म्हणाला की, ते वेडे २१ व्या शतकात गोळीबार करीत आहेत. त्यांनी माझ्या घराबाहेरसुद्धा गोळीबार केला. त्याला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायची होती; पण मी त्याला त्यांच्यातच ही गोष्ट सोडवावी, असा सल्ला दिला. तो मला म्हणाला की, त्यांनी माझी माफी मागावी, नाही तर मी पोलीस ठाण्यात तक्रार करेन.
पुढे रणजीत म्हणाले की संजय खानबरोबर बोलणे झाल्यानंतर मी प्रकाश मेहरा व शत्रुघ्न सिन्हा यांना फोन केला आणि त्यांनी संजय खानची माफी मागावी, यासाठी त्यांची समजूत घातली. प्रकाश व शत्रुघ्न सिन्हा माझ्या घरी आले. संजय अजून यायचा होता. त्यानंतर मी माझ्या घराकडे एक कार येताना पाहिली. त्यामध्ये झीनत व एक वकील होता. त्यानंतर मला पोलिसांच्या गाडीचे सायरन ऐकू येऊ लागले. माझ्या घराला पोलिसांनी वेढल्याचे लक्षात आले. संजय खानने पोलिसांना सांगितले होते की, या सर्वांनी एकत्र येऊन मला मारण्याची योजना आखली होती. शेवटी मला पोलिसांशी बोलावे लागले. मी संजयला घरी येण्यासाठी मनधरणी केली. तो घरी आला. त्यानंतर मला व शत्रुघ्नला त्याने जी करिअर बनवण्यात मदत केली होती, त्याबद्दल त्याने ऐकवले. मला कामावर जाण्यासाठी उशीर होत होता. त्यामुळे त्यांना मी माझ्या घरी सोडून बाहेर पडलो. संध्याकाळी मला समजले की, शत्रुघ्न सिन्हा व प्रकाश मेहरा यांना सांताक्रुझ पोलिस ठाण्यात नेण्यात आले होते. दिलीप कुमारला त्यात हस्तक्षेप करावा लागला होता. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात, रणजीतच्या घरी हत्येचा कट रचण्यात आला होता, अशा मथळ्याची बातमी होती. कालांतराने शेवटी वाद मिटवण्यात आला, अशी आठवण रणजीत यांनी सांगितली.