Ranveer Allahbadia Row: काही दिवसांपूर्वी यूट्यूबवरील ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमुळे मोठा वाद निर्माण झाला होता आणि हा वाद अजूनही सुरूच आहे. प्रसिद्ध यूट्यूबर समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये रणवीर अलाहाबादियाने पालकांबद्दल केलेल्या अश्लील वक्तव्यामुळे हा वाद पेटला होता. रणवीरने पालकांबद्दल केलेल्या अश्लील वक्तव्यामुळे त्याच्यावर सामान्य जनतेसह अनेक कलाकार मंडळींनीदेखील टीका केली होती. रणवीर अलाहाबादियाच्या (Ranveer Allahbadia) या वक्तव्यानंतर त्याच्यावर सोशल मीडियासह सर्वच माध्यमांमधून टीकेची झोड उठली. अशातच आता सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते शेखर सुमन यांनीही रणवीरला खडेबोल सुनावले आहेत. शेखर सुमन यांनी, “हे विकृतीचे स्वातंत्र्य आहे. फक्त सॉरी म्हणून चालणार नाही”, असे म्हणत रणवीरला चांगलेच फटकारले आहे. तसेच सरकारलादेखील अशा शोवर बंदी घालण्याची आणि अशा लोकांना देशाबाहेर काढण्याची मागणी केली आहे.
एका कार्यक्रमात ‘इन्स्टंट बॉलीवूड’शी बोलताना शेखर सुमन यांनी ‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या वादावर प्रतिक्रिया दिली आणि रणवीर अलाहाबादियावर ( Ranveer Allahbadia ) जोरदार टीका केली. तसेच पालकांबद्दल केलेल्या अश्लील वक्तव्य ऐकल्यानंतर शेखर सुमन यांनी ‘किळस’ आल्याचेही म्हटले. याबद्दल शेखर सुमन यांनी स्पष्ट केले, “पालकांबद्दल अश्लील टिप्पणी करणाऱ्या अशा लोकांना देशाबाहेर हाकलून लावले पाहिजे. त्यांनी या देशात राहू नये.” शेखर सुमन पुढे म्हणाले, “लोक रोस्टच्या नावाखाली यूट्यूबवर अश्लील गोष्टी करत आहेत आणि त्याला ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य, असं म्हणत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ असा नाही की, तुम्ही शिव्या द्याल किंवा अशा घाणेरड्या गोष्टी कराल की, ते ऐकून एखाद्या व्यक्तीला मनस्ताप होईल. अशा लोकांना या देशाबाहेर हाकलून दिले पाहिजे.”
शेखर सुमन यांची सरकारला विनंती
त्यापुढे ते म्हणाले, “मी सरकारला अशी विनंती करतो की, अशा लोकांचे हे शो सरकारने कायमचे बंद केले पाहिजेत. त्यांना देशाबाहेर हाकलून दिले पाहिजे. त्यांना रंगूनला पाठवले पाहिजे. पूर्वी लोकांना तडीपार केले जात असे, तसेच यांनाही देशाच्या बाहेर कुठेतरी पाठवले पाहिजे.”. दरम्यान, पालकांबद्दलच्या अश्लील वक्तव्यानंतर रणवीरला जीवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्या होत्या. त्याबद्दल त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पण, न्यायालयानेही त्याला या प्रकरणी चांगलेच फटकारले.
पालकांबद्दलच्या अश्लील वक्तव्यानंतर रणवीरने ( Ranveer Allahbadia ) आपली चूक मान्य केली होती आणि माफीही मागितली होती. पण हे प्रकरण इतके तापले की, त्याच्या माफीचा काही परिणाम झाला नाही. त्याशिवाय हा मुद्दा संसदेतही उपस्थित झाला. त्यानंतर अशा कंटेंटचा प्रचार व प्रसार थांबविण्यासाठी कंटेंटसाठी वेगळा कायदा आणण्याची मागणी करण्यात आली. सध्या या प्रकरणाची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या प्रतिक्रियेनंतर, समयने ‘इंडियाज गॉट लेटेंटचे सर्व भाग यूट्यूबवरून हटवले आहेत.