Ranveer Allahbadia : युट्यूबर रणवीर अलाहाबादियाने समय रैनाच्या शोमधील एका स्पर्धकाला विचारलेल्या आक्षेपार्ह प्रश्नावरून वातावरण तापलं आहे. त्याच्याविरुद्ध अनेक ठिकाणी तक्रारीही दाखल झाल्या आहेत. लोक त्याच्या वक्तव्याबद्दल संताप व्यक्त करत आहेत. रणवीरने माफी मागितली आहे, मात्र पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. याचदरम्यान ज्येष्ठ लेखक व गीतकार जावेद अख्तर यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते विनोदात अपशब्द वापरणं योग्य आहे की नाही, त्याबद्दल मत मांडताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या वर्षी चिल सेशच्या एका भागात जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी सपन वर्मा, बिस्वा कल्याण रथ आणि श्रीजा चतुर्वेदी यांच्याबरोबर चर्चा केली होती. यादरम्यान, बिस्वा कल्याण रथ यांनी जावेद अख्तर यांना अपशब्द वापरणाऱ्या स्टँड-अप कॉमेडियनबद्दल त्यांचे मत विचारलं होतं. “जेव्हा आपण विनोद करतो तेव्हा आपण अपशब्द, भाषा वापरतो आणि लोक हसतात. हळूहळू ती सवय बनते. इतरांना आपल्या बोलण्याचं वाईट वाटलं तरी आपल्याला त्याबद्दल वाईट वाटत नाही. यावर तुमचं मत काय आहे? विनोद करताना असे अपशब्द वापरणं योग्य आहे का?” असा प्रश्न रथ यांनी विचारला होता.

या प्रश्नाचं उत्तर देताना अख्तर म्हणाले होते, “मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ओडिशा, बिहार व मेक्सिको आणि जगात जिथे जिथे गरिबी आहे तिथे लोक भरपूर तिखट खातात कारण अन्न साधं असतं, त्यात थोडी चव यावी, यासाठी ते मिरची जास्त खातात. शिवी ही भाषेतील मिरची आहे. जर तुम्ही चांगली भाषा बोलू शकत असाल आणि तुम्ही चांगल्या भाषेत विनोद करू शकत असाल तर तुम्हाला या मिरचीची गरज भासत नाही.”

रणवीर अहलाबादियाचं वक्तव्य नेमकं काय?

शोमध्ये रणवीरने एका स्पर्धकाला विचारलं की, “तुला तुझ्या पालकांना आयुष्यभर सेक्स करताना पाहायला आवडेल की तुला त्यांच्याबरोबर सामील होऊन ते कायमचं थांबवायला आवडेल?” यापैकी कोणताही एक पर्याय निवडायला रणवीरने सांगितलं. रणवीरचा प्रश्न ऐकल्यानंतर समय रैना म्हणतो की हे सर्व त्याच्या पॉडकास्टचे रिजेक्ट झालेले प्रश्न आहेत.

दरम्यान, रणवीरने माफी मागितली असली तरी पोलीस तक्रारीनंतर आता रणवीरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. हा व्हिडीओ युट्यूबने हटवला आहे. पोलीस रणवीरच्या मुंबईतील घरी गेले आहेत.