करण जोहर दिग्दर्शित आगामी चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ची सध्या जोरदार चर्चा आहे. या चित्रपटात रणवीर सिंह आणि आलिया भट्ट प्रमुख भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाच्या घोषणेनंतर चाहते आता या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहे. नुकतेच करण जोहरने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करीत या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्याबाबतची तारीख जाहीर केली आहे.
हेही वाचा- Video: गौरी खानच्या ‘या’ गोष्टीची शाहरुखला वाटते खूप भीती; म्हणाला, “मी स्टंट करू शकतो, पण…”
करण जोहरने शेअर केलेल्या पोस्टनुसार, उद्या (२० जून रोजी ) प्रेक्षकांना ‘रॉकी आणि राणीच्या प्रेमकथेची’ पहिली झलक पाहायला मिळणार आहे. करणने चित्रपटातील रणवीर सिंग आणि आलिया भट्टचे पोस्टर शेअर करीत चित्रपटाच्या टीझरची घोषणा केली आहे. उद्या (२० जून रोजी ) धर्मा प्रोडक्शनच्या यूट्यूब चॅनलवर सकाळी ११.४५ वाजता टीझर प्रदर्शित करण्यात येणार आहे. पोस्ट शेअर करीत करण जोहरने लिहिले, ‘ही या प्रेमाच्या युगाची सुरुवात आहे! रॉकी आणि राणीच्या प्रेमकथेचा टीझर उद्या प्रदर्शित होत आहे. आता तुमचा अलार्म सेट करा!’ याचबरोबर करणने रॉकी आणि राणीची प्रेमकथा असा हॅशटॅग वापरला आहे.
‘रॉकी और रानी की प्रेम काहानी’ या चित्रपटात रणवीर आणि आलियाबरोबर अभिनेता धर्मेंद्र, अभिनेत्री जया बच्चन आणि शबाना आझमी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. धर्मेंद्र आणि जया बच्चन यांनी रणवीरच्या आई-वडिलांची भूमिका साकारली आहे तर शबाना आझमी यांनी आलियाच्या आईची भूमिका साकारली आहे.