बहुप्रतिक्षीत ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा बॉलीवूड चित्रपट शुक्रवारी (२८ जुलै) सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाला समीक्षक व प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दिग्दर्शक करण जोहरचा कमबॅक चित्रपट असलेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये रणवीर सिंह, आलिया भट्ट, धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी यांच्यासह अनेक कलाकार आहेत.
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटाची गेले काही दिवस चांगलीच चर्चा होती. मीडिया रीपोर्टनुसार या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ११.५० कोटींची कमाई केली. अपेक्षेपेक्षा हे आकडे कमी असले तरी या चित्रपटाने चांगली सुरुवात केली. आता याच्या दुसऱ्या दिवशीच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत जे फारच समाधानकारक आहेत.
आणखी वाचा : “रोमान्सला वयाची…” ७२ वर्षीय शबाना आझमींसह दिलेल्या किसिंग सीनवर ८७ वर्षीय धर्मेंद्र यांची प्रतिक्रिया
‘सॅकनिल्क’च्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ने दुसऱ्या दिवशी जवळपास १६ कोटींची कमाई केली आहे. इतकंच नव्हे तर या चित्रपटाने दोन दिवसांत २५ कोटींचा टप्पा पार केला आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने एकूण २७.१० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटाचं बजेट १६० कोटी असल्याचं सांगितलं जात आहे.
आता या वीकेंडला या चित्रपटाच्या कमाईत काही फरक पडणार की नाही ते येणारा काळच सांगेल. दरम्यान, करण जोहरने या चित्रपटाच्या माध्यमातून सात वर्षांनी दिग्दर्शनात पुनरागमन केलं आहे. फॅमिली ड्रामा असलेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये ‘गली बॉय’नंतर पुन्हा एकदा आलिया व रणवीर मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात आलियाने बंगाली मुलीची तर रणवीरने पंजाबी मुलाची भूमिका साकारली आहे.