बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट जोडप्यांपैकी एक म्हणजे रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण. ऑनस्क्रीन असो वा ऑफस्क्रीन; ते नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. २०१८ मध्ये त्यांनी लग्न केलं. रणवीर आणि दीपिका यांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. आता लवकरच ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल विविध खुलासे करताना दिसणार आहेत.
‘कॉफी विथ करण’चे सात सीझन यशस्वी झाल्यानंतर आता लवकरच आठवा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीझनमध्ये करण जोहर बॉलीवूडमधील रिअल लाइफ कपल्सना आमंत्रित करणार आहे. त्यामध्ये दीपिका आणि रणवीरही असतील.
पिंकविलाच्या वृत्तानुसार, ‘कॉफी विथ करण’च्या आठव्या सीझनमध्ये दीपिका आणि रणवीर एकत्र हजेरी लावणार आहेत. यावेळी ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य करतील. तसेच यावेळी ते त्यांचे चित्रपट, चित्रपटातील काही वादग्रस्त किस्से आणि त्यावर त्यांचं मतही नोंदवताना पाहायला मिळणार आहेत. तसेच त्यांच्याबद्दल पसरवण्यात येणाऱ्या विविध अफवांबद्दलही ते बोलणार आहेत. त्यामुळे आता ते त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल काय काय बोलणार याकडे त्यांच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. ‘दिपवीर’ला ‘कॉफी विथ करण ८’च्या मंचावर एकत्र बघण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक झाले आहेत.